लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : भुयारी गटार योजनेच्या कामासाठी संपूर्ण वाघापूर परिसर खोदून ठेवला आहे. मुख्य रस्त्यांसह अंतर्गत भागात जाण्यासाठीचे मार्ग खोदकामामुळे अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहे. हा प्रश्न लाखो लोकांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. पावसामुळे झालेल्या चिखलातून मार्ग काढताना केव्हा आणि कुठे अपघात होईल याचा नेम राहिलेला नाही.येथील नंदूरकर शाळा ते राऊतनगरचे वळण हा या भागातील प्रमुख रस्ता आहे. याठिकाणी दोन किलोमीटरपेक्षा अधिक खोदकाम रस्त्याच्या अगदी मधातून करण्यात आले आहे. थोड्या थोड्या अंतरावर गडर बांधण्यात आले. खोदकाम झालेला रस्ता योग्यरित्या बुजविला गेला नाही. सदर काम अर्धवट असतानाच नागरिकांच्या घरापासून ते गडरपर्यंत पाईप टाकण्याचे काम हाती घेतले. एक ना धड भाराभर चिंध्या अशी परिस्थिती असताना काम वाढविण्याचा सपाटा सुरू आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे हा संपूर्ण रस्ता चिखलमय झाला आहे.वाघापूर परिसरातील रंभाजीनगर, संभाजीनगर, महात्मा फुले सोसायटी, रविदासनगर, राजस्व कॉलनी आदी भागांमध्ये अंतर्गत रस्ते फोडून भुयारी गटार योजनेचे काम सुरू केले आहे. अवघ्या काही महिन्यांपूर्वी बांधलेले सिमेंट रस्तेही फोडण्यात आले. योजनेचे काम विकासाचे असले तरी यापूर्वी झालेला ‘विकास’ विचारातच घेतला गेला नाही. आता तर पावसामुळे हा संपूर्ण परिसर अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे. या रस्त्यावर दररोज वाहने घसरून पडण्याचे प्रकार वाढले आहे. एक काम पूर्ण झाल्यानंतर दुसरे हाती घेऊन नागरिकांचा होणारा त्रास कमी करावा, अशी अपेक्षा आहे. तशा सूचनाही काही लोकांनी केल्या आहे. दरम्यान, रस्त्याच्या खोदकामामुळे काही लोकांच्या व्यवसायावरही परिणाम झाला आहे. या कामांमध्ये नियोजनबद्धता न आणल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा वाघापूरचे माजी सरपंच विक्की राऊत यांनी नगरपरिषदेला दिला आहे.
भुयारी गटाराच्या कामाने वाघापूरची ‘वाट’ कठीण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2019 9:40 PM
भुयारी गटार योजनेच्या कामासाठी संपूर्ण वाघापूर परिसर खोदून ठेवला आहे. मुख्य रस्त्यांसह अंतर्गत भागात जाण्यासाठीचे मार्ग खोदकामामुळे अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहे. हा प्रश्न लाखो लोकांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. पावसामुळे झालेल्या चिखलातून मार्ग काढताना केव्हा आणि कुठे अपघात होईल याचा नेम राहिलेला नाही.
ठळक मुद्देचिखलमय रस्ते : दररोज होत आहेत अपघात, मधोमध असलेले गटार धोक्याचे