अविनाश साबापुरेलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सलग पावणेदोन वर्षापासून घरातच बंदिस्त झालेल्या पहिली-दुसरीच्या चिमुकल्यांसाठी खुशखबर आहे. येत्या बुधवारपासून प्राथमिक शाळेचे वर्गही ऑफलाइन सुरू केले जाणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ३ लाख १४ हजार विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा वर्गमित्रांच्या गोतावळ्यात रममाण होण्याची संधी मिळणार आहे. सध्या शहरी भागात आठवी ते बारावी आणि ग्रामीण भागात पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहे. मात्र, शहरी भागातील पहिली ते सातवी आणि ग्रामीण भागातील पहिली ते चौथीचे वर्ग अद्यापही बंदच आहेत. याबाबत गुरुवारी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुद्दा ठेवला. त्यात १ डिसेंबरपासून प्राथमिकचे सर्वच वर्गही सुरू करण्याचा निर्णय झाला. या अनुषंगाने जिल्हा परिषद शिक्षण विभागाने प्राथमिक आणि उच्च प्राथमिकचे सर्वच वर्ग बुधवारपासून प्रत्यक्ष सुरू करण्याची तयारी पूर्ण केली आहे. सध्या हे वर्ग बंद असले तरी दररोज शिक्षकांची शाळेत ड्यूटी लावण्यात आली आहे. आता बुधवारपासून प्रत्यक्ष अध्यापनाला सुरुवात केली जाणार आहे.
आश्रमशाळांचा मात्र निर्णय नाही - राज्य शासनाच्या निर्णयानुसार राज्य मंडळाच्या शाळांमधील प्राथमिकचे वर्ग १ डिसेंबरपासून सुरू केले जाणार आहेत. त्यासोबतच सीबीएसई शाळांचेही वर्ग सुरू होणार आहेत. मात्र, आश्रमशाळांमधील प्राथमिकचे वर्ग सुरू करण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. या शाळा निवासी स्वरूपाच्या असल्याने त्याबाबत आदिवासी विकास विभाग, तसेच समाजकल्याण विभागाच्या स्वतंत्र निर्णयाची प्रतीक्षा केली जात आहे.
वसतिगृहांचा निर्णय कधी होणार ? - पहिलीपासूनचे वर्ग १ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिकचे वर्ग आधीच सुरू झाले आहे. मात्र एसटीचा संप आणि बंद असलेली वसतिगृहे यामुळे अनेक विद्यार्थ्यांची अडचण झाली आहे. याबाबत शासनाने अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे वसतिगृह सुरू करण्याबाबतही निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.
शासन आदेशानुसार वर्ग सुरू करण्याची आपली सर्व तयारी झाली आहे. या वर्गातील विद्यार्थी व शिक्षकांना सोशल डिस्टन्स, मास्क या नियमांचे पालन करावे लागेल. आपल्या सर्व शाळा यापूर्वीच सॅनिटायइझ झाल्या आहेत. तरीही हात धुण्यासाठी प्रत्येक शाळेत साबण व पाण्याची व्यवस्था केली आहे. तापमापी, पल्स ऑक्सिमीटर ठेवले आहे. मात्र, विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची सक्ती केली जाणार नाही. -प्रमोद सूर्यवंशी, शिक्षणाधिकारी प्राथमिक