कार्यकर्त्यांना हवी नवसंजीवनी : दिग्गज नेते मतदारसंघात दिसू लागलेयवतमाळ : लोकसभेपाठोपाठ विधानसभेतील दारूण पराभवाने कोमात गेलेल्या काँग्रेसला नवसंजीवनी देणार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे. पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांना या कठीण परिस्थितीतून बाहेर निघण्यासाठी नव्या दमाच्या ‘नवा गडी नवा राज’ची प्रतीक्षा आहे. यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेस भुईसपाट झाली आहे. लोकसभेत सपाटून मार खाल्ल्यानंतर त्याचीच पुनरावृत्ती विधानसभेत पहायला मिळाली. काँग्रेसच्या ताब्यातील वणी, आर्णी, राळेगाव, यवतमाळ, उमरखेड या पाचही जागांवर भाजपाने डल्ला मारला. या जागांवर काँग्रेसचे दिग्गज व दीर्घ अनुभवी नेते पराभूत झाले. काँग्रेसच्या हाती काहीच राहिले नाही. भाजपाच्या नवख्या उमेदवारांनी काँग्रेस नेत्यांकडून गड खेचून घेतला. या पराभवाने काँग्रेसचे दिग्गज नेते, उमेदवारच नव्हे तर कार्यकर्तेही कोमात गेले आहे. लोकसभेत पराभवानंतर सुमारे दोन महिने या प्रमाणे काँग्रेसमध्ये सामसूम होती तीच स्थिती आज विधानसभेनंतर पहायला मिळत आहे. पराभवाची कारणमिमांसा नाही, की चिंतन नाही. सर्व जण जणू कोमात गेल्याचे चित्र पहायला मिळत आहे. नेते, पदाधिकारी कुणीच काही बोलण्यास तयार नाही. काँग्रेसला कोमातून बाहेर काढण्यासाठी पुढाकार कोण घेणार, या कार्यकर्त्यांमध्ये जीव कोण फुंकणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांना पक्षाकडून ऊर्जा मिळण्याची अपेक्षा आहे. त्यासाठी जुन्या नेत्यांना बाजूला सारुन नव्या दमाच्या नेत्याकडे नेतृत्व देण्याची मागणी जोर धरु लागली आहे. काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष बदलवा, तरुणांमधीलच अनुभवी व्यक्तीकडे जिल्ह्याचे नेतृत्व द्या, असेच बदल विविध आघाड्या आणि शाखांच्या स्तरावरही घडवून आणा यातूनच काँग्रेस नव्या दमाने पुन्हा उभी राहील, पक्षाला नवा कार्यक्रम द्या, कार्यकर्त्यांना ताकद द्या, आंदोलनाची दिशा द्या असा एकमुखी सूर सामान्य कार्यकर्त्यांमधून ऐकायला मिळत आहे. केंद्रात आणि राज्यात सलग दहा ते पंधरा वर्ष काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार होते. मात्र या सत्तेच्या काळातच पक्षाचा सामान्य कार्यकर्ता उपेक्षित राहिला. त्याला कुठेच काहीच मिळाले नाही. सर्व काही नेतेच गब्बर झाले. या सत्तेच्या काळात नेत्यांना कार्यकर्त्यांकडे लक्ष देण्यासाठी सवडही मिळाली नाही. नेते कायम सत्तेच्या गुरमीत वावरताना दिसले. आज मात्र पराभवाची चव चाखल्यानंतर हेच नेते जमिनीवर आलेले पहायला मिळत आहे. एरव्ही मतदारसंघातून गाडीची काळी काच चढवून फिरणारे, निवडकच कार्यकर्ते-कंत्राटदारांच्या घरी भेटी देणारे हे नेते आता मतदारसंघात कुणालाही आणि कुठेही सहज उपलब्ध होऊ लागले आहे. सत्तेत नसतानाप्रमाणे कुण्याच्याही लग्न, बारसे, तेरवी अशा कार्यक्रमांना हजेरी लावू लागले आहे. कधी नव्हे ती कार्यकर्त्यांची आस्थेने विचारपूस करताना दिसत आहे. नेत्यांमधील हा बदल कदाचित दोन वर्षाआधी असता तर आज जिल्ह्यातील काँग्रेसच्या पाचही जागा शाबूत असत्या, असा कार्यकर्त्यांचा सूर आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
काँग्रेसला प्रतीक्षा ‘नवा गडी नवा राज’ची
By admin | Published: November 01, 2014 11:13 PM