लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यंदा कोरोनामुळे सीईटीचेही त्रांगडे झाले. त्यामुळे प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया आणि त्यानंतर प्रत्यक्ष वर्ग अध्यापन कधी सुरू होणार, याबाबत अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे. तर सीईटीचा निकाल घोषित होऊन प्रत्यक्ष अध्यापन करता यावे याची जिल्ह्यातील चारही अभियांत्रिकी महाविद्यालयांना प्रतीक्षा लागली आहे. यवतमाळ शहरात जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात (जेडीआयईटी) यंदा ३३० जागा उपलब्ध आहे. जगदंबा महाविद्यालयात २७० तर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात ३३० जागा आणि पुसदच्या बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयात ३०० जागा आहेत. प्रत्यक्ष सीईटीचा निकाल लागल्यानंतर यावर्षी ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी होणार आहे. त्यानंतर मेरीट लिस्ट आणि महाविद्यालयांचे ऑप्शन उपलब्ध होईल. या संपूर्ण प्रक्रियेला साधारण महिनाभराचा कालावधी लागणार असला तरी सीईटी सेलकडून अद्याप सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया बाकी असली तरी द्वितीय, तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग यापूर्वीच महाविद्यालयांनी सुरू केले आहे. मात्र प्रथम वर्षाचे अध्यापन सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांना फार कमी कालावधी मिळण्याची शक्यता आहे.
नोव्हेंबरअखेर सीईटीचा निकालअभियांत्रिकी कभ्यासक्रमाची पहिली सीईटी १ ते ३० ऑक्टोबरदरम्यान घेण्यात आली. अतिवृष्टीसह अनेक कारणांमुळे अनेक विद्यार्थी वंचित राहिले. त्यामुळे ७नोव्हेंबर रोजी पुन्हा सीईटी घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल २८ नोव्हेंबरपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील प्रवेश प्रक्रिया राबविली जाईल.
अद्याप निर्देश नाही सध्या नववी ते बारावीच्या वर्गाबाबतच वरिष्ठ पातळीवरून निर्देश आले आहे. अभियांत्रिकी महाविद्यालये कधी सुरू करावी याबाबत अद्याप निर्देश नाही. त्यामुळे काही सांगता येणार नाही. - एम. डी. सिंहजिल्हाधिकारी, यवतमाळ