१० वर्षांपासून एकच हुद्दा : एएसआयची प्रारूप यादी यवतमाळ : जिल्हा पोलीस दलातील अनेक जमादार पदोन्नतीच्या प्रतीक्षेत सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत. सहाय्यक फौजदारांच्या निवृत्तीने रिक्त झालेल्या जागांसाठी ज्येष्ठांची भलीमोठी निवड सुची आहे. सहाय्यक फौजदाराच्या २८ जागा पदोन्नतीने भरण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयाने प्रारूप यादी प्रसिध्द केली आहे. यावर ९ आॅगस्ट पर्यंत आक्षेप मागविण्यात आले आहेत. मात्र दीड दशकापेक्षा अधिक काळ लोटूनही पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या जमादारांचा यामुळे हिरमोड झाला आहे. पोलीस दलात १९८५-८६ मध्ये रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना अजूनही जमादार ते सहाय्यक फौजदार अशी पदोन्नती मिळाली नाही. यातील अनेक कर्मचारी दोन ते तीन वर्षात सेवानिवृत्त होणार आहे. सलग १० वर्षे एकाच पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये संताप आहे. सहायक फौजदारांची पदे रिक्त झाल्याशिवाय त्या जागेवर पदोन्नती मिळत नाही. पदोन्नती देताना रिक्त जागेच्या बिंदुनामावलीनुसारच प्रक्रिया केली जाते. त्यांनतर ज्येष्ठतेतून पदोन्नती पात्र कर्मचाऱ्यांची निवडसुची तयार होेते. जमादार म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामाचा दीर्घ अनूभव आल्यानंतर त्यांना अधिकारी सहायक फौजदाराच्या दर्जापेक्षाही मोठी जबाबदारी सोपवितात. गुणवत्ता व ज्येष्ठता असूनही एकाच पदावर राबावे लागते. आता सहाय्यक फौजदाराच्या २८ रिक्त जागांसाठी पदोन्नतीने पदभरती सुरू आहे. त्यासाठी ज्येष्ठ कर्मचाऱ्यांची प्रारूप यादी प्रसिध्द केली असून त्यावर आक्षेप मागितले. शिवाय शिपाई ते जमादार यासाठी २७ कर्मचाऱ्यांची यादी प्रसिध्द केली आहे. आक्षेपाचे निराकरण केल्यानंतरच अंतिम यादी प्रसिध्द होणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी) अशी आहे निवडसूची पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या चालू वर्षातील निवड सुचीमध्ये जमादार ते सहाय्यक फौजदारासाठी १३९ कर्मचारी आहेत. नाईक शिपाई ते जमादार पदोन्नतीसाठी २२५, शिपाई ते नाईक शिपाई पदोन्नतीसाठी १७५ कर्मचारी निवड सूचीत आहे. दरवर्षी ही निवड सुची तयार केली जाते. सेवानिवृत्ती, मृत्यू आणि बदलीने रिक्त झालेल्या जागांवर पदोन्नती दिली जाते. डिसेंबर अखेरपर्यंत या निवड सुचीनुसार प्रक्रिया चालते. जानेवारीमध्ये पुन्हा ही निवड सुची अद्यावत केली जाते.
पोलीस जमादारांना पदोन्नतीची प्रतीक्षा
By admin | Published: August 07, 2016 1:08 AM