उमरखेड (कुपटी) : पैनगंगा नदी तीरावर असलेल्या पूरग्रस्त गावांचे पुनर्वसन गेल्या कित्येक वर्षांपासून रखडले आहे. पावसाळा आला की कागदी घोडे नाचविले जातात. मात्र पुनर्वसन होत नाही. तालुक्यातील रेडझोनमधील अनेक गावांना पुनर्वसनाची प्रतीक्षा कायम आहे. लोकप्रतिनिधी आणि अधिकारीही दुर्लक्ष करीत असल्याने पावसाळ्यात ही मंडळी जीव मुठीत घेऊन राहत आहे. उमरखेड तालुक्यातील बहुतांश गावे पैनगंगेच्या तीरावर आहे. दरवर्षी पैनगंगेला पूर येतो. डझनावर गावांना पुराचा तडाखा बसतो. अनेक गावातील नागरिक महापुराच्या वेढय़ात अकडून पडतात. कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. मात्र पुनर्वसनाचा प्रश्न तसाच रेंगाळत राहतो. तालुक्यातील पळशी, देवसरी, संगम चिंचोली येथील नागरिकांना २00६ साली महापुराचा फटका बसला. त्यानंतर पुनवर्सनाची आश्वासन देण्यात आले. १९५८ पासून २00६ पर्यंंत पुनर्वसनासाठी पाठपुरावा करण्यात आला. परंतु पुनर्वसन झाले नाही. पळशी, देवसरी, संगमचिंचोली या गावांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया लालफितीत अडकली आहे. खरे तर २00६ च्या महापुरानंतर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी वर्षभरात पुनर्वसन करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु आता आठ पावसाळे झाले तरी पुनर्वसन झालेच नाही. अतवृष्टी आणि इसापूर धरणातील अतिरिक्त पाणी सोडण्यात येत असल्याने पैनगंगेला महापूर येतो. शेकडो एकर जमीन बाधित होते. नागरिक यात उद्ध्वस्त होतात. पुनर्वनासाठी अनेकदा उपोषणासह आंदोलने करण्यात आली. प्रत्येक वेळी राजकीय मंडळींनी आश्वासने दिली. प्रशासनाने त्यावेळी मान डोलावली. परंतु कुणीही लक्ष दिले नाही. रेडझोनमधील गावांना महापुराचा फटका बसणार नाही, यासाठी कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाही. पळशी, चिंचोली, मार्लेगाव, चातारी, देवसरी, खरूस, बंदी टाकळी, गाडीबोरी आदी गावांना महापुराचा फटका बसतो. यावर्षी पुन्हा पावसाळा तोंडावर आला आहे. मृग नक्षत्र सुरू झाले आहे. लवकरच पावसालाही सुरुवात होईल. नदी तिरावरील गावांमध्ये पुन्हा पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर येणार आहे. (वार्ताहर)
रेड झोन गावांना पुनर्वसनाची प्रतीक्षा
By admin | Published: June 09, 2014 12:10 AM