पुनर्गठन : ५६ हजार शेतकरी लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्य शासनाने घोषित केलेल्या कर्जमाफीचा लाभ थकबाकीदार शेतकऱ्यांसोबतच कर्जाचे पुनर्गठन झालेल्या शेतकऱ्यांंना मिळणार आहे. जिल्ह्यात २०० कोटींच्या पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले असून याचा ५६ हजार शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.जिल्हा मध्यवर्ती बँक, राष्ट्रीयकृत बँक आणि ग्रामीण बँकेने शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन केले होते. पुनर्गठित कर्जाची पाच वर्षात टप्प्याटप्प्याने परतफेड करायची होती. हप्ते पाडलेल्या कर्जाची अनेक शेतकऱ्यांना परतफेड करता आली नाही. त्यामुळे पुनर्गठनानंतरही शेतकरी अडचणीत सापडले होते. यातून मार्ग काढण्यासाठी दुसऱ्यांदा पुनर्गठन करण्यात आले. मात्र दुष्काळी स्थितीने ही तोकडी उपाययोजनाही निकामी झाली. यामुळे कर्जाचे पुनर्गठन करण्यात आलेले शेतकरी अडचणीत सापडले होते. राज्य शासनाच्या कर्जमाफी घोषणेत कर्जाची पुनर्गठन करण्यात आलेले शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरणार असल्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत केला आहे. त्यामुळे कर्जाचे पुनर्गठन करण्यात आलेले शेतकरी मदतीस पात्र ठरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ५६ हजार शेतकऱ्यांना थकीत कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले आहे. या शेतकऱ्यांकडे २०० कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे. या सर्वांना लाभ होणार आहे. राष्ट्रीयकृत बँकांच्या पुनर्गठनाची माहिती मात्र उपलब्ध झाली नाही. जिल्ह्यात कर्जमाफी मिळणाऱ्या शेतकऱ्यांसोबतच आता पुनर्गठन झालेल्या शेतकऱ्यांनाही लाभ मिळेल. अडचणी सुटणार कर्जमाफीनंतर जिल्हा बँकेचा कारभार पूर्वपदावर येण्यास मदत होणार आहे. यामुळे गत अनेक वर्षांपासून बँकेचे सभासद होण्यास इच्छुक असलेल्यांना कर्जमाफीनंतर बँकेचे नवीन सभासद होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
२०० कोटी पीक कर्ज होणार माफ
By admin | Published: June 27, 2017 1:23 AM