आसिफ शेख ।लोकमत न्यूज नेटवर्कवणी : वेकोलिच्या वणी नॉर्थ क्षेत्राला अखेरची घरघर लागली आहे. सातपैकी तीन खुल्या कोळसा खाणी बंद झाल्या असून दोन भूमिगत कोळसा खाणी बंद होण्याच्या मार्गावर आहे. अपेक्षित असे कोळशाचे उत्पादन होत नसल्याने या कोळसा खाणी बंद करण्यात आल्या आहे. परिणामी या उद्योगावर अवलंबून असलेल्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.कोळसा खाणी बंद होत असल्याने वणी शहरालगतच्या लालपुलिया परिसरातील कोळशाची बाजारपेठही ओस पडल्याचे दिसून येते. वणी नॉर्थ क्षेत्रामधील घोन्सा, पिंपळगाव, कोलार पिंपरी या तीन कोळसा खाणी पूर्णपणे बंद करण्यात आल्या, तर भांदेवाडा व कुंभारखणी या भूमिगत कोळसा खाणी कोणत्याही क्षणी बंद होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मनुष्यबळ अधिक व कोळसा उत्पादन कमी अशी स्थिती या कोळसा खाणीत आहे. वणी नॉर्थमधील उकणी-जुनाडा क्षेत्रातील दोन खाणी सुरू आहे. वणी तालुक्यातील उकणी कोळसा खाणीतून अतिशय दर्जेदार कोळशाचे उत्पन्न होत असल्याने या खाणीचा लौकिक देशभर आहे. या खाणीने २०१०४-१५ या आर्थिक वर्षात १२४ कोटींचा नफा कमविला. या खाणीची स्थापना १९९८२ या वर्षी झाली. वणी क्षेत्रातील सर्वाधिक उत्पन्न देणारी ही खाणही आता अखेरच्या घटका मोजत आहे.२०१६ मध्ये उकणी खाणीत उत्पादन खर्च वाढल्याने कोळशाचे भावही वाढले. त्यामुळे या खाणीचा कोळसा तब्बल एक वर्ष खाणीतच पडून होता. तो खरेदी करायला कुणीच तयार नव्हते. परिणामी या खाणीत काम करणारे कामगार चिंतेत पडले होते. सदर खाण बंद होते की काय, अशी स्थिती निर्माण झाली होती. ही खाण बंद करून बंद असलेली घोन्सा येथील कोळसा खाण सुरू करण्याचा घाट वेकोलिच्या वरिष्ठ पातळीवरून घातल्या गेला होता.अर्थव्यवस्थेवर परिणामवणी तालुक्यात तब्बल १२ कोळसा खाणी आहेत. या खाणीत हजारो कामगार राबतात. त्यामुळे वणी परिसराची आर्थिक उलाढालही मोठी आहे. मात्र दिवसेंदिवस हा उद्योग संकटात येत असल्याने त्याचा दुष्परिणाम वणीच्या अर्थव्यवस्थेवर दिसून येत आहे. या भागातील आर्थिक उलाढालही मंदावली आहे.
वेकोलिच्या वणी नॉर्थला घरघर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2017 9:51 PM
वेकोलिच्या वणी नॉर्थ क्षेत्राला अखेरची घरघर लागली आहे. सातपैकी तीन खुल्या कोळसा खाणी बंद झाल्या असून दोन भूमिगत कोळसा खाणी बंद होण्याच्या मार्गावर आहे.
ठळक मुद्देतीन कोळसा खाणी बंद : कोळसा उद्योग मंदावल्याने रोजगाराची समस्या