लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ :मधुबन खुशबू देता हैंसागर सावन देता हैंजीना उस का जीना हैंजो औरों को जीवन देता हैंअशा आशयघन शब्द-सुरांतून मातोश्री वीणादेवी दर्डा यांच्या स्मृतिदिनी गुरुवारी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. दर्डा उद्यानाच्या परिसरातील रम्य ‘मधुबन’ साक्षी ठेवून कलावंतांनी ‘जीवनाचे मधुबन’ सुरांतून सजविले. ‘सुरज ना बन पाये तो बन के दीपक जलता चल...फुल मिले या अंगारे सच की राहो मे चलता चल’ या ओळींतून मातोश्री वीणादेवी यांच्या समाजाभिमुख स्वभाववैशिष्ट्यावर प्रकाश टाकण्यात आला.लोकमत परिवार आणि जवाहरलाल दर्डा फाउंडेशनतर्फे मातोश्री दर्डा सभागृहात गुरुवारी सायंकाळी ही ‘भजन-भावगीत संध्या’ पार पडली. प्रारंभी सर्व कलावंतांनी मातोश्री वीणादेवी दर्डा यांच्या प्रतीमेला अभिवादन केले. ‘नादातुनिया नाद निर्मिती श्रीराम जय राम जय जय राम’ या गजराने मनोज तिडके यांनी मैफलीचा श्रीगणेशा केला. तर प्रा. अपर्णा शेलार यांनी तलम स्वरात ‘मधुबन’ पेश केले.प्रा. अतुल शिरे, राजू कोळमकर या दमदार गळ्याच्या गायकांनी भजने सादर करून श्रोत्यांना अक्षरश: भक्तीरसात चिंब भिजवून टाकले. मन मंदिरा, येई ओ विठ्ठले या रचनांनी उत्स्फूर्त दाद मिळविली. सांगा मुकुंद कुणी हा पाहिला, हे द्रुतगतीचे गीत राजू कोळमकर यांनी ताकदीनिशी सादर केले. तर अतुल शिरे यांनी ‘जग मे सुंदर हैं दो नाम चाहे क्रिष्ण कहो या राम’ म्हणत अनुप जलोटांच्या गायकीची रसिकांना आठवण करून दिली. ‘तू अंतर्यामी सब का स्वामी, तेरे चरणो मे चारो धाम’ या भजनातून खुद्द जगजितसिंग यांच्या खर्जातील गायनाची अतुल शिरे यांनी मेजवानी दिली. ‘ही वाट दूर जाते’ म्हणत प्रा. अपर्णा शेलार यांनी रसिकांना ‘स्वप्नामधील गावा स्वप्नामधून’ नेले. त्यापाठोपाठ स्वीटी जुळे यांनी ‘अल्ला तेरो नाम’, ‘क्षणभर उघड नयन देवा’ ही भजने सादर केली. तर अर्णवी बोरीकर यांनी ‘केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर’ हे भावगीत गायले.रसिक ज्यांच्या गायनाची आतुरतेने वाट बघत होते, ते नामवंत गायक प्रा. राहुल एकबोटे शास्त्रीय सुरांची बरसात घेऊन आले. प्रा. एकबोटे यांचे स्वर आणि तबल्याची जुगलबंदी घडताच टाळ्यांचा पाऊसही पडला. ‘बादलवा बरसत नाही’ ही बंदिश सुरू होताच ‘जाणते रसिक’ खुश झाले. शेवटी ‘कानडा राजा पंढरीचा’ हा अभंग गाऊन प्रा. राहुल एकबोटे यांनी कार्यक्रमाचा समारोप केला.प्रा. अश्विनी इंदूरकर यांनी प्रत्येक गीताची माहिती देत रसाळ निवेदन केले. नरेंद्र राजूरकर, सौरभ देवधर (तबला), माळवी (हार्मोनियम), विशाल शेंदरकर (आॅर्गन) या वाद्यवृंदांनी उत्तम साथसंगत करत श्रोत्यांची भरभरून दाद मिळविली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अजय कोलारकर यांनी केले. तर उपस्थितांचे आभार लोकमत जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा यांनी मानले.चिमुकल्या रिद्धीचे विशेष कौतुकप्रा. राहुल एकबोटे यांच्यासारख्या कसलेल्या गायकाच्या नेतृत्वात यवतमाळातील गोड गायकांनी मातोश्री वीणादेवी दर्डा यांना स्वरांजली अर्पण केली. याच कार्यक्रमात रिद्धी कांडुलवार या चिमुकल्या मुलीने अत्यंत धीटपणे आणि पट्टीच्या तालमीने ‘कान्हा कान्हा’ हे गीत सादर केले. त्याबद्दल लोकमत जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा यांनी रिद्धीचा विशेष सत्कार केला.
सच की राहों पे चलता चल...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 10:01 PM
दर्डा उद्यानाच्या परिसरातील रम्य ‘मधुबन’ साक्षी ठेवून कलावंतांनी ‘जीवनाचे मधुबन’ सुरांतून सजविले. ‘सुरज ना बन पाये तो बन के दीपक जलता चल...फुल मिले या अंगारे सच की राहो मे चलता चल’ या ओळींतून मातोश्री वीणादेवी यांच्या समाजाभिमुख स्वभाववैशिष्ट्यावर प्रकाश टाकण्यात आला.
ठळक मुद्देभजन, भावगीत संध्या : मातोश्री वीणादेवी दर्डा यांना सुरांतून भावपूर्ण श्रद्धांजली