वणी : गेल्या विधानसभा निवडणुकीत पराभूत होऊनही काँग्रेस नेते वामनराव कासावार अद्याप राजकारणात सक्रिय आहेत. यवतमाळ जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष असल्याने ते पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होत आहे. सहा विधानसभा निवडणूक लढविणारे माजी आमदार वामनराव कासावार राजकीय क्षेत्रात मुत्सद्दी म्हणून परिचित आहे. सहापैकी चारदा त्यांनी निवडणूक जिंकून विधानसभेत आपली चुणूक दाखविली आहे. गेल्या २0१४ च्या निवडणुकीत मात्र त्यांना पराभवाचा झटका बसला. तथापि ते राजकीय प्रवाहात कायम आहे. २0 वर्षे आमदारकी भूषविल्यामुळे त्यांना प्रचंड राजकीय अनुभव आहे. सत्तेत असताना सतत ते कार्यकर्त्यांच्या गराड्यात राहात होते. मात्र आता कार्यकर्र्त्यांचा गराडा थोडा कमी झाला. तरीही ते आपल्या जुन्या बसण्याच्या ठिकाणी हजेरी लावतात. कार्यकर्त्यांना भेटतात, त्यांची वास्तूपुस्त करतात. वणी विधानसभा क्षेत्रात सहकारात काँग्रेस मजबूत आहे. नुकत्याच झालेल्या येथील वसंत जिनींगच्या निवडणुकीत कासावार यांनी हिरीरीने सहभाग घेतला. त्यांचे १७ पैकी १६ उमेदवार त्यात विजयी झाली. आता कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी विक्री संघ आणि ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत ते व्यस्त आहे. मतदार संघाशी त्यांनी कायम संपर्क ठेवला आहे. विधानसभेतील पराभवानंतर त्यांनी आता शेतीकडेही लक्ष देण्यास सुरूवात केली आहे. झरीजामणी तालुक्यातील पाटण या त्यांच्या मूळ गावी ते शेतात जात आहे. कासावार जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष असल्याने पक्षाच्या विविध बैठका, कार्यकर्त्यांच्या भेटी घेण्यात ते सरसावले आहे. विरोधी पक्षात असल्याने आता ते पूर्वीपेक्षाही जादा तडफेने पक्षाचे काम करीत असल्याचे दिसून येत आहे.
वामनराव कासावार कार्यकर्त्यांच्या गोतावळ््यात
By admin | Published: July 04, 2015 2:44 AM