सेतू केंद्रातून वाटप बंदचा परिणाम : पीक कर्ज वाटप प्रभावित होण्याची भीती यवतमाळ : यावर्षी १५ एप्रिलपासूनच पीक कर्जाचे वाटप होणार असल्याने शेतकऱ्यांची या कर्जासाठी लागणाऱ्या सातबाराची जुळवाजुळव करण्याकरिता लगबग सुरू आहे. पूर्वी हा सातबारा सेतू केंद्रातून दिला जात होता. मात्र ४ रुपये जास्त घेत असल्याचा ठपका ठेऊन सेतू केंद्रातून हे काम काढून घेण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांना आता सातबारासाठी तलाठ्याच्या मागे फिरावे लागते. आर्थिक भुर्दंड मात्र पूर्वीसारखाच कायम असल्याचे सांगितले जाते. लगतच्या वर्धा जिल्ह्यात ई-डिस्ट्रीक्टचे काम जोरात सुरू आहे. तेथे अद्ययावत सातबारा मिळतो आहे. यवतमाळ जिल्ह्यात या प्रकल्पाचे संपूर्ण काम अद्याप सुरू झालेले नाही. वर्धेत तीन महिन्यांपासून अद्ययावत सातबारा दिला जात असताना यवतमाळ जिल्हा प्रशासनाकडून मात्र ९० टक्के काम पूर्ण झाले, लवकरच अद्ययावत सातबारा मिळणार एवढेच उत्तर वारंवार दिले जात आहे. पूर्वी जिल्ह्यातील सुमारे २२० सेतू केंद्रातून सातबाराचे वितरण केले जात होते. तीन गावामिळून एक सेतू केंद्र देण्यात आले होते. तेथे सातबारासाठी २३ रुपये व ८/३ साठी २३ रुपये असे ४६ रुपये घेतले जात होते. मात्र सेतू केंद्रात ५० ची नोट दिल्यानंतर ४ रुपये परत मिळत नाहीत, सातबारा ५० रुपयात पडतो, अशा शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या. म्हणून जिल्हा प्रशासनाने सेतू केंद्राकडील हे काम काढून घेऊन थेट तलाठ्याकडे दिले. मात्र तेथेही आर्थिक भुर्दंड तेवढाच आणि त्रास अधिक होत असल्याचा शेतकरी वर्गातील सूर आहे. पीक कर्जासाठी सातबारा आवश्यक आहे. त्यामुळे हा सातबारा मिळविण्याची शेतकऱ्यांची धडपड आहे. मात्र त्यासाठी शेतकऱ्यांना तलाठ्याकडे येरझारा माराव्या लागत आहे. कोतवालाच्या मागे ५० रुपये घेऊन फिरुनही वेळेत सातबारा मिळत नसल्याची ओरड आहे. इकडे सेतू केंद्रावरसुद्धा सातबारा मिळावा म्हणून शेतकऱ्यांचा आग्रह आहे. तेथे वाद निर्माण होत आहे. सेतू केंद्रावरुन पेरे पत्रक मिळाले तरी ते खातरजमा करण्यासाठी तलाठ्याकडे पाठविले जात असल्याने आणि तेथे विलंब लागत असल्याने शेतकऱ्यांमध्ये खरी नाराजी आहे. (प्रतिनिधी)
सातबारासाठी शेतकऱ्यांची तलाठ्यांमागे भटकंती
By admin | Published: April 13, 2017 12:54 AM