वणी : शासनाकडून भटक्या समाज बांधवांचे स्थलांतर रोखण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहे. मात्र आजही अनेक भटक्या जमातींमध्ये अशिक्षितपणा कायम असून भटक्या जमातीतील नागरिकांचे बिर्हाड पाठीवरच दिसून येत आहे. शासनाच्या विविध योजनाही त्यांच्यापर्यंत पोहोचत नसल्याचे वास्तव आहे.भटक्या जमातीची अनेक कुटुंबे राज्यात वास्तव्यास आहेत. त्यांची सदैव भटकंती सुरू असते. हाताला काम मिळेल, या आशेने अद्यापही त्यांची अविरत भटकंती सुरूच आहे. परिणामी असे भटके समाज बांधव विकासापासून कोसो दूर आहेत. विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या या भटक्या जमातीतील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. त्यासाठी त्यांच्यापर्यंत विविध शासकीय योजना पोहोचविण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र प्रत्यक्षात त्यांच्यासाठी असलेल्या शासकीय योजनांचा त्यांना लाभच मिळत नाही. वीतभर पोटाची टीचभर भूक शमविण्याकरिता अद्यापही त्यांना या गावातून त्या गावात भटकंती करावी लागत आहे.भटक्या जमातीतील नागरिकांना कुठेही राहायला जागा मिळत नसल्यामुळे कोणत्याही गावानजीकच्या रस्त्याच्या कडेलाच किंवा गावातील पडीत जागेवर तंबू ठोकून ते उन्हा-तान्हात कसेतरी वास्तव्य करतात. पडित असलेल्या मोकळय़ा जागेवर पाल बांधून त्यांचे वास्तव्य सुरू होते. त्याच पालात त्यांची चिलीपाली असतात. त्यांची या गावातून त्या गावात सतत भटकंती सुरूच असते. परिणामी त्यांच्या मुलांना शिक्षण मिळणेही कठीण झाले आहे. भटक्या जमातीतील अनेक चिमुरडी हातात ‘घण’ घेऊन कुटुंबाला मदत करतात. घणाचे घावच त्यांचे पोट भरते. शिक्षणाचा त्यांना गंधही नसतो. ही मुले शिक्षणापासून कोसो दूर आहेत. उदरनिर्वाहासाठी गावोगाव भटकंती करणार्या भटक्या समाजातील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभच मिळताना दिसत नाही. एवढेच नव्हे, तर त्यानील अनेकांची मतदार यादीतही नावे नसतात. सतत भटकत असल्याने त्यांच्याजवळ कायमचा कोणताही पुरावासुद्धा नसतो. परिसरातील बर्याच गावांमध्ये मोठय़ा प्रमाणात भटका समाज वास्तव्यास आला आहे. त्यांना सतत कामाच्या शोधात या गावातून त्या गावात भटकंती करावी लागत आहे. परिणामी त्यांच्या चिमुकल्यांच्या शिक्षणाची पंचाईत होत आहे. शाळा हा शब्दच त्यांना कळेनासा झाला आहे. सततच्या भटकंतीमुळेच भटक्या समाजात आजही अशिक्षितपणाचे प्रमाण अधिक आहे. लिहिता, वाचता येत नसल्याने त्यांना त्यांच्यासाठी असलेल्या योजनांचा लाभही घेणे दुरापास्त झाले आहे. विविध योजनांसाठी कुठे जावे, कुणाकडे दाद मागावी, असा प्रश्न त्यांना पडतो. योजनाच माहत नसल्याने त्यांना त्या योजनेचा लाभ मिळत नाही. परिणामी वार्षानुवर्षे हा भटका समाज अद्यापही भटकंती करीत फिरतच आहे. शासन आणि प्रशासनाने अशा भटक्या जमातींकडे लक्ष देऊन त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी करून घेण्याची खरी गरज आहे. त्यांनाही इतर मानवाप्रमाणे मानव म्हणून ओळख देण्याची नितांत गरज आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
भटक्यांचे बिर्हाड अद्याप पाठीवरच
By admin | Published: June 08, 2014 12:11 AM