वणी तालुक्यात राष्ट्रवादी काॅंग्रेसला पडणार खिंडार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2021 12:18 PM2021-12-13T12:18:50+5:302021-12-13T13:36:35+5:30

जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील बदललेल्या वातावरणामुळे घुसमट होत असल्याचा ठपका ठेवत पक्षाचे राज्य सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांच्यासह मतदार संघातील जवळपास सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते कॉंग्रेस पक्षात विलीन होत आहेत.

In Wani taluka NCP leader mahendra lodha will join congress | वणी तालुक्यात राष्ट्रवादी काॅंग्रेसला पडणार खिंडार

वणी तालुक्यात राष्ट्रवादी काॅंग्रेसला पडणार खिंडार

Next
ठळक मुद्देपक्षातील वातावरणामुळे घुसमट होत असल्याचा आरोप

संतोष कुंडकर,

यवतमाळ : अलीकडे जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील बदललेल्या वातावरणामुळे घुसमट होत असल्याचा ठपका ठेवत पक्षाचे राज्य सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांच्यासह मतदार संघातील जवळपास सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते कॉंग्रेस पक्षात विलीन होत आहेत. रविवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वणीतील पक्षाच्या कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमातच सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. या घडमोडीमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

कॉंग्रेस प्रवेशाचा मुहूर्त लवकरच ठरवला जाणार आहे. या राजकीय घडामोडीमुळे वणी विधानसभा मतदार संघात कॉंग्रेस पक्षाला आणखी बळकटी मिळणार असून दुसरीकडे वणी विधानसभा मतदार संघात सक्षम नेतृत्वाअभावी राष्ट्रवादी कॉंग्रेस पुन्हा एकदा कोमात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

काही वर्षांपूर्वी विद्यमान शिवसेना नेते संजय देरकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला रामराम ठोकल्यानंतर वणी विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अस्तित्वच संपुष्टात आले होते. कालांतराने राष्ट्रवादीचे नेते तथा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी असलेल्या मैत्रीमुळे डॉ. लोढा यांनी वणी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. संपूर्ण विधानसभा मतदार संघात कार्यकर्त्यांचे मोठे जाळे विणले आणि पक्षाला नवसंजीवनी बहाल केली.

सन २०१९ मध्ये पार पडलेल्या निवडणुकीपूर्वी कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे वणीत आले. त्यावेळी त्यांनी आपल्या भाषणात वणी विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादीच्या वाट्याला मागणार असून या मतदार संघातून डॉ. महेंद्र लोढा यांना पक्षाची तिकीट देणार, अशी गगनभेदी घोषणा केली होती. मात्र तसे घडले नाही. कॉंग्रेसच्या वाट्यात असलेला वणी विधानसभा मतदार संघ कॉंग्रेसकडेच कायम राहिला. अखेर डॉ. लोढांना वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर विधानसभेची निवडणूक लढवावी लागली. निवडणुकीत पराभव वाट्याला आल्यानंतरही त्यांनी पक्षाची साथ मात्र सोडली नाही. परंतु अलीकडे यवतमाळ जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील बदललेल्या वातावरणामुळे घुसमट होत असल्याचा आरोप स्थानिक राष्ट्रवादीचे नेते करीत आहेत.

याच घुसमटीतून स्वत: डॉ. महेंद्र लोढा, वणी विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष, महिला आघाडी अध्यक्ष, वणी विधानसभेतील सर्व उपाध्यक्षांसह शेकडो कार्यकर्ते लवकरच कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गोटातून सांगण्यात आले.

वडेट्टीवारांच्या भेटीला राष्ट्रवादीचे पदाधिकारी रवाना

रविवारी सकाळी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचा वाढदिवस वणीत साजरा करून दुपारी ३ वाजताच्या सुमारास डॉ. महेंद्र लोढा व राष्ट्रवादीचे महत्त्वाचे पदाधिकारी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा कॉंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या भेटीसाठी ब्रह्मपुरीकडे रवाना झाले. रविवारी ना. वडेट्टीवार यांचादेखील वाढदिवस असून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही जात आहोत, असे डॉ. लोढा यांनी सांगितले. मात्र ही भेट राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे.

राष्ट्रवादी पक्ष बळकट करण्यासाठी अनेक वर्षांपासून मी आणि माझ्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. परंतु पक्षाने अखेरपर्यंत न्याय दिला नाही. अलीकडे आम्हा सर्वांचीच पक्षात घुसमट होत असल्याने आम्ही सर्वांनीच राष्ट्रवादी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

-डॉ. महेंद्र लोढा, राज्य सरचिटणीस, राष्ट्रवादी कॉंग्रेस

माझी आणि डॉ. महेंद्र लोढा यांची या विषयात चर्चा झाली. कॉंग्रेसमध्ये येण्याची त्यांनी संपूर्ण तयारी केली आहे. पक्षात त्यांचे स्वागतच आहे. त्यांच्या प्रवेशाने वणी विधानसभा मतदार संघात कॉंग्रेस पक्षाला निश्चित बळकटी मिळणार आहे.

वामनराव कासावार, माजी आमदार तथा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस, कॉंग्रेस

Web Title: In Wani taluka NCP leader mahendra lodha will join congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.