आरिफ अली ।ऑनलाईन लोकमतबाभूळगाव : तालुक्यातील मुबारकपूरनजीक प्रस्तावित वर्धा बॅरेज मध्यम प्रकल्प निधीअभावी रखडला आहे. या प्रकल्पासाठी यंत्रणेने यावर्षी शासनाकडे ७२ कोटी रुपयांची मागणी केली होती. प्रत्यक्षात केवळ आठ कोटी रुपये प्राप्त झाल्याने या प्रकल्पाचे भवितव्यच टांगणीला लागले आहे.बाभूळगाव तालुक्यातील १७ गावांना सिंचन सुविधा देण्यासाठी मुबारकपूरनजीक वर्धा बॅरेज मध्यम प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली. २०२० पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. या प्रकल्पामुळे तालुक्यातील परसोडी, घारफळ, सिंदी, रेणुकापूर, वलिदापूर, पाचखेड, येरंडगाव, वडगाव, हादगाव, मुबारकपूर, राऊत सावंगी, गोंधळी, किन्ही, सारफळी, वाटखेड (बु), सरूळ आणि खर्डा या १७ गावातील पाच हजार ६६३ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. यात कॅनलद्वारे तीन हजार ६८ हेक्टर तर ठिबक सिंचनाद्वारे दोन हजार ५९५ हेक्टर जमिनीचे ओलित होणार आहे. गेल्या पाच वर्षांपूर्वी या प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले. कंत्राटदाराचे अद्याप ३० कोटीचे देयक शासनाकडे प्रलंबित आहे. यावर्षी या प्रकल्पासाठी ७५ कोटींची मागणी करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात केवळ आठ कोटी रुपये मिळाल्याने या प्रकल्पाचे काम रखडले आहे.तालुक्यातील १७ गावातील जमीन या प्रकल्पामुळे ओलिताखाली येणार आहे. २०२० पर्यंत प्रकल्प पूर्ण होणार असल्याचे सांगितले गेले. मात्र शासन दरवर्षी तोकडा निधी देत असल्याने हा प्रकल्प रखडला आहे. परिणामी १७ गावातील शेतकऱ्यांचे सिंचनाचे स्वप्न अपूर्णच राहण्याची शक्यता आहे. थकीत देयकापोटी या आधीसुद्धा कंत्राटदाराने काम बंद केले होते. आताही तोकडा निधी मिळाल्याने कंत्राटदार गाशा गुंडाळण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे.शासनाचे विदर्भाकडे कायम दुर्लक्षशेतकºयांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या प्रकल्पाकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. विदर्भातील जवळपास सर्वच प्रकल्पाला तोकडा निधी मिळत आहे. यातून कंत्राटदाराचे देयक देणेही कठीण झाले आहे. परिणामी कंत्राटदार काम सोडण्याच्या स्थितीत आले आहे. प्रस्तूत प्रतिनिधी यासंदर्भात मध्यम प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता राठोड यांची भेट घेतली असता त्यांनी यावर्षी वर्धा बॅरेज प्रकल्पासाठी केवळ आठ कोटींची तरतूद झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. मात्र पुढील वर्षी या बॅरेजमध्ये पाणी अडविण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.
निधीअभावी वर्धा बॅरेज प्रकल्प रखडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 11:53 PM
तालुक्यातील मुबारकपूरनजीक प्रस्तावित वर्धा बॅरेज मध्यम प्रकल्प निधीअभावी रखडला आहे. या प्रकल्पासाठी यंत्रणेने यावर्षी शासनाकडे ७२ कोटी रुपयांची मागणी केली होती.
ठळक मुद्दे७२ कोटींची मागणी : मिळाले केवळ आठ कोटी