रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : परतीच्या पावसाने शेतमालाची प्रत घसरली आहे. या धान्याला खुल्या बाजारात कमी दर मिळत आहे. असे धान्य सुरक्षित करण्यासाठी शेतकऱ्यांनी वखार महामंडळाकडे धाव घेतली. गुणवत्ता घसरलेला शेतमाल स्वीकारण्यास वखार महामंडळांनी नकार दिला आहे. तर खासगी गोदामातील धान्यावर कर्ज देताना बँकांनी हात झटकले आहेत.खुल्या बाजारात शेतमालाचे दर पडल्यास शेतमालास संरक्षण देणारी यंत्रणा उभी करण्यात आली. त्याकरिता राज्य वखार महांमडळ आणि केंद्रीय वखार महामंडळाची निर्मिती करण्यात आली. वखार महामंडळात शासकीय धान्यासोबत शेतमाल ठेवण्याची तरतूद आहे. वखार महामंडळाच्या क्षमतेनुसार हे धान्य ठेवले जाते. या ठिकाणी ठेवलेल्या धान्यावर तारण दिले जाते. त्याचे व्याजदर अत्यल्प असतात.तारण म्हणून ठेवलेल्या धान्याला बँका खुल्या बाजारातील दराच्या ७० टक्के कर्ज देते. यामुळे दर पडलेल्या अवस्थेत शेतकरी वखार महामंडळाच्या गोदामाकडे धाव घेतात. यावर्षी सोयाबीनचे दर घसरले आहेत. गुणवत्ता घसरलेल्या धान्याला संरक्षण मिळावे म्हणून शेतकऱ्यांनी असे धान्य वेअर हाऊसकडे हलविले. मात्र वखार महामंडळांनी धान्य नियमात बसत नाही म्हणून नाकारले आहे. परतीच्या पावसाने भिजलेले धान्य खराब होणार या भीतीने वखार महामंडळ असे धान्य ठेवण्यासाठी तयार नाही. बँकाही अशा धान्यावर कर्ज देण्यास तयार नाही. यातून शेतकऱ्यांची चांगलीच कोंडी झाली आहे.व्यापाऱ्यांची संख्या घटलीखरेदी झालेले धान्य ठेवायचे, त्यावर कर्ज घ्यायचे आणि नव्याने व्यापार करायचा, असा वखार महामंडळाचा व्यवहार चालत होता. आता गोदामात धान्यच स्वीकारले गेले नाही. यामुळे पैशाची गुंतवणूक थांबली आहे. बाजारात धान्य खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्या घटली आहे.नियमानुसार, १२ ते १४ टक्के ओलावा असणारा शेतमालच गोदामात ठेवता येतो. यापेक्षा जास्त ओलावा असणारा शेतमाल घेतला जात नाही. तो वाळवून आणल्यानंतरच ठेवण्यास परवानगी दिली जाते. अन्यथा बुरशीने शेतकºयांच्या मालासह इतरही शेतमाल खराब होतो. चांगल्या मालास कुठलीही हरकत नाही.- भास्कर भगत, प्रभारी व्यवस्थापक, केंद्रीय वखार महामंडळ, यवतमाळ
ओला शेतमाल ठेवण्यास वखार महामंडळाचा नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 11:05 AM
परतीच्या पावसाने शेतमालाची प्रत घसरली आहे. या धान्याला खुल्या बाजारात कमी दर मिळत आहे. असे धान्य सुरक्षित करण्यासाठी शेतकऱ्यांनी वखार महामंडळाकडे धाव घेतली. गुणवत्ता घसरलेला शेतमाल स्वीकारण्यास वखार महामंडळांनी नकार दिला आहे.
ठळक मुद्देपरतीच्या पावसाने प्रत घसरली छोटे कर्ज मंजूर करताना बँकांनी झटकले हात