फोटो
दिग्रस : गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेला पावसामुळे अरुणावती धरणात ९९.३६ टक्के जलसाठा झाला आहे. त्यामुळे धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले असून, परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
धरणातील पाण्याची पातळी नियंत्रित करण्यासाठी यापूर्वी नऊ गेटमधून प्रति सेकंद ३७० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. मात्र, दोन दिवसांपासून पाऊस बंद झाल्याने, रविवारी सकाळी १० नंतर चार दरवाजे बंद करण्यात आले. आता पाच दरवाज्यांतून ११५ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून अरुणावती धरण परिसरात संततधार पाऊस सुरू होता. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे.
अद्याप पाण्याची आवक सुरूच असल्याने, पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
धरणात आणखी पाणी वाढण्याची शक्यता गृहित धरून धरणाच्या जवळपासच्या सर्वच गावांतील नागरिकांना अरुणावती प्रकल्प विभागाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धरणातील पाणी सोडल्यास धरण पात्रात अथवा धरणाच्या पुढील भागात मासेमारी करण्यासाठी कुणीही येऊ नये, असे आवाहन उपविभागीय अभियंता सागर आलाटकर यांनी केले आहे.