यवतमाळ : पुण्याला जाण्यासाठी घरातून एकटीच निघालेल्या वाशिम जिल्ह्यातील विवाहितेचा खून झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मंगळवारी तब्बल सहा दिवसांनंतर तिचा मृतदेह दिग्रसनजीक छिन्नविछिन्न अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. आता मारेकरी शोधण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.
पूजा पंजाबराव वानखडे (२९) असे मृत महिलेचे नाव आहे. ती वाशिम जिल्ह्यातील वाई गौळ (ता. मानोरा) येथील रहिवासी होती. १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता पुण्याला जाण्यासाठी घरातून निघाली होती. मात्र ती पुण्यात पोहोचलीच नाही. तर ११ नोव्हेंबर रोजी दिग्रस ते तुपटाकळी रोडवर नागोबाच्या मंदिराजवळ पूजाचे आधारकार्ड, पर्स, कपडे व चिवडा असे साहित्य आढळले. ही माहिती मिळताच पूजाचा भाऊ परिक्षित पंजाबराव वानखडे याने पोलीस ठाण्यात येऊन आपली बहीण घरातून निघून गेल्याची तक्रार दाखल केली. पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असतानाच मंगळवार, १६ नोव्हेंबर रोजी पूजाचा मृतदेह ईश्वर देशमुख सैनिकी शाळेजवळ एका शेतात आढळून आला.
या शेतात मंगळवारी कापूस वेचणीसाठी मजूर महिला आल्या होत्या; मात्र त्यांना दुर्गंधी आल्याने शोध घेतला असता छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह दिसला. ‘मिसिंग’ची तक्रार असल्याने दिग्रस पोलिसांनी पूजाच्या नातेवाइकांना बोलावून मृतदेहाची ओळख पटविली. मृतदेह कुजलेला असल्याने घटनास्थळीच शवविच्छेदन करून आई, बहीण व भावाच्या समक्ष सावंगा येथे अंत्यविधी करण्यात आला.
या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी आदित्य मिरखेकर, पोलीस निरीक्षक सोनाजी आमले यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक रत्नपारखी करीत आहेत.
श्वान पथक धरणावर घुटमळले
पूजाचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळल्यानंतर तिचा भाऊ परिक्षित याने दिग्रस पोलिसात खुनाची तक्रार दाखल केली. पोलिसांनी घेतलेल्या बयाणातही त्याने खुनाचा संशय व्यक्त केला. दरम्यान, पोलिसांनी श्वान पथक घटनास्थळी बोलावून मारेकऱ्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला; मात्र हे श्वान घटनास्थळाजवळील धरणाजवळच घुटमळले. आता आरोपींचा शोध घेण्याचे पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे.