यवतमाळ : आरक्षणाच्या मागणीसाठी धोबी (परिट) बांधवांनी सोमवारी जिल्हा कचेरीसमोर ‘कपडे धुणे’ आंदोलन केले. या अभिनव आंदोलनाने यवतमाळकरांचे लक्ष वेधून घेतले. मागणीचे निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले. भारत स्वतंत्र होण्याच्या आधीपासूनच धोबी समाजाचा अनुसूचित जातीच्या यादीत समावेश होता. विदर्भातील भंडारा आणि बुलडाणा या जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या यादीत समावेश आहे. इतर राज्यात अनुसूचित जातीत समावेश आहे. मात्र शासनाच्या चुकीमुळे अनुसूचित जातिच्या यादीतून समाजाला वगळण्यात आले आणि मिळणाऱ्या सवलती बंद करण्यात आल्या. राज्य शासनाच्या समाज कल्याण विभागाने २६ मार्च १९७९ ला केंद्र शासनाकडे अहवाल सादर केला. यात धोबी जातीचा अनुसूचित जातीत समावेश करावा, अशी शिफारस करण्यात आली होती. ६ सप्टेंबर २००४ च्या अहवालात धोबी या जातीचा अनुसूचित जातीत समावेश करावा, अशी शिफारस करण्यात आली आहे. मात्र कुठलीही कारवाई झाली नाही. धोबी समाज आर्थिकदृष्ट्या मागासला आहे. यामुळे समाजाला आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी विदर्भ अध्यक्ष राजेन्द्र मुळे, चंद्रशेखर केळतकर, राजू तुरणकर, प्रकाश क्षीरसागर, विठ्ठल क्षीरसागर, संदीप कापसे, संजय घोंगडे, विजय नेरकर, सचिन पत्रकार, सुनील खुरसाने, सुभाष क्षीरसागर यासह विविध तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. (शहर वार्ताहर)
आरक्षणासाठी धोबी समाजाचे कचेरीसमोर कपडे धुणे आंदोलन
By admin | Published: September 20, 2016 2:02 AM