सर्वेक्षण : जिल्हा परिषद सदस्याने दिले वडिलांच्या स्मृती ५० हजारढाणकी : उमरखेड तालुक्यातील ढाणकी म्हणजे कायम पाणीटंचाईचे गाव. सुमारे तीस हजार लोकसंख्या कायम तहानलेली. या गावाची तहान भागविण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य बाळू पाटील चंद्रे यांनी पुढाकार घेतला आहे. अमडापूर प्रकल्पाचे पाणी ढाणकीपर्यंत आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न चालविले आहे. सर्वेक्षणासाठी त्यांनी ५० हजारांची रक्कम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला दिली आहे.पाणीटंचाई या शब्दाची तीव्रता काय असू शकते हे जाणून घ्यायचे असेल तर एकदा तरी ढाणकीला यावे लागेल. ढाणकीतील नागरिकांना भर पावसाळ्यातही आठ ते दहा दिवसांआड एकवेळ पाणी मिळते. सध्या ढाणकीकरांना महिन्याला एकदा पाणी मिळत आहे. याचे कारण म्हणजे गावाची वाढती लोकसंख्या व पाणी वितरणाची ४० वर्षांपूर्वीची व्यवस्था होय. ढाणकीत नळ योजना सुरू झाली. त्यावेळी लोकसंख्या आठ ते दहा हजार होती. आज ढाणकीची लोकसंख्या ३० हजाराच्या आसपास आहे. गावात दोन विहिरी व पैनगंगा नदी अशा दोन ठिकाणाहून पाणीपुरवठा होतो. परंतु यंदा पाऊस कमी झाल्याने विहिरी कोरड्या पडल्या आणि नदीत पाण्याचा ठणठणाट आहे. शेतकऱ्यांच्या विहिरीवरून पाणीपुरवठा करावा लागतो.ढाणकीची पाणीटंचाई कायमस्वरूपी दूर करण्याचा एकमेव उपाय म्हणजे कुरळी लगतच्या अमडापूर धरणाचे पाणी ढाणकीत आणणे होय. धरण ढाणकीपासून २० किलोमीटर अंतरावर आहे. धरणावरून ढाणकीपर्यंत पाणी आणण्याच्या कामाचे सर्वेक्षण होणार आहे. सर्वेक्षणाचे काम जलद गतीने व्हावे म्हणून जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब चंद्रे यांनी ५० हजार रुपयांचा धनादेश जिल्हा परिषद अध्यक्ष आरती फुपाटे यांच्या स्वाधीन केला. ही रक्कम त्यांनी आपले वडील नारायणराव पाटील चंद्रे यांच्या स्मृती प्रीत्यर्थ जीवन प्राधिकरणाला दिली आहे. यावेळी शिक्षण सभापती नरेंद्र ठाकरे, बांधकाम सभापती सुभाष ठोकळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मल्लीनाथ कलशेट्टी उपस्थित होते. बाळासाहेब चंद्रे यांच्या या दातृत्वामुळे लवकरच ढाणकीला मुबलक पाणी मिळेल, अशी आशा आहे. यामुळे गावकऱ्यातही समाधान व्यक्त केले जात आहे. (वार्ताहर)
ढाणकीत अमडापूर प्रकल्पाचे पाणी
By admin | Published: January 15, 2016 3:17 AM