पाणी टिकविणारा ‘विश्वासनगर पॅटर्न’यवतमाळ : जिल्ह्यात धो धो पाऊस बरसतो. तरी उन्हाळ्यात थेंबही मिळत नाही. या दुष्काळी चक्रावर मात करण्यासाठी यवतमाळचे जलमित्र नितीन खर्चे यांनी नवी शक्कल लढवली आहे. आज संपूर्ण शहरात पाणी पातळी खाली गेली आहे. मात्र विश्वासनगरात मुबलक पाणी आहे. त्यांच्या या ‘विश्वासनगर पॅटर्न’ची दखल नंदूरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आहे. नगरपरिषदेनेही खुल्या मैदानात हा प्रयोग राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी आपल्या सूचना केंद्राकडे पाठविल्या आहेत. विवेकानंद विद्यालयाचे उपमुख्याध्यापक नितीन खर्चे यांनी भूगर्भाचा चांगलाच अभ्यास केला आहे. त्यातून पाणीटंचाईवर मात करण्याचा उपाय सूचविला आहे. त्याची अंमलबजावणी त्यांनी विश्वासनगरातून सुरू केली आहे. ओपन स्पेस, मंदिर, इमारती, खेळाचे मैदान, गावठाण या ठिकाणी उताराच्या भागात खोल खड्डा खोदला जातो. हा खड्डा १५ फूट लांब १५ फूट रूंद आणि सात फूट खोल आहे. यामध्ये प्रथम मोठे दगड, नंतर छोटे दगड आणि सर्वात वर टोळगोट्यांचा थर टाक ला आहे. यामुळे पावसाचे पाणी झिरपून सरळ खाली जाते. त्या ठिकाणी ४० लाख लिटर पाणी मुुरविले जाते. यातून पाणीपातळी रिचार्ज होते. लगतच्या विहरी, बोअरवेल आणि हातपंपाला पाणी येते. याच पॅटर्नने या भागातील पाणी पातळी वाढली आहे. विश्वासनगरसह मनिहार ले-आऊट, राधाकृष्ण आश्रम, जाजू कॉलेज, भुलई, पिंपळशेंडा, श्रीरामपूर या ठिकाणी हा प्रयोग राबविण्यात आला. त्याची दखल घेत नंदूरबारचे जिल्हाधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांनी त्यांना नंदूरबारमध्ये प्रयोग राबविण्यासाठी निमंत्रण दिले आहे. नगरपरिषदेच मुख्याधिकारी सुधाम धुुपे यांनी यवतमाळ शहरातील आठ मैदानात हा प्रयोग राबविण्याचा निर्णय घेतला. नगरपरिषद स्वखर्चाने हा प्रयोग सार्वजनिक विहिरी, हातपंप आणि बोअरवेलच्या ठिकाणी राबविणार आहे. इतकेच नव्हेतर, केंद्र शासनाकडे यासाठी खर्चे यांनी पत्र दिले आहे. प्रयोग पाहण्याचे निमंत्रणही जलसंपदा विभागाला दिले आहे. कमी खर्चात लोकसहभागातून हा प्रयोग यशस्वी झाला आहे. (शहर वार्ताहर)
पाणी टिकविणारा ‘विश्वासनगर पॅटर्न’
By admin | Published: May 22, 2016 2:15 AM