रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : निसर्गाच्या लहरीपणाने राज्यातील २४ जिल्ह्यांमध्ये पाणीबाणी निर्माण झाली आहे. या जिल्ह्यांमध्ये आत्तापर्यंत तब्बल ५४ टक्के पावसाची तूट निर्माण झाली आहे. परिणामी पिकांची स्थिती बिकट झाली असून डोळ्यादेखत पीक करपत असल्याने शेतकरी आत्महत्येचा आलेख वाढत आहे.पावसाअभावी या जिल्ह्यांमधील सर्व प्रकल्पांनी तळ गाठण्यास सुरूवात केली. यातून पाणी प्रश्न गंभीर होत आहे. मानवाच्या पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याची स्थिती चिंताजनक झाली आहे. यामुळे २४ जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सापडले आहे. दुसरीकडे अशा अडचणीच्या काळात राष्ट्रीयीकृत बँकांनी कर्ज पुनर्गठनास नकार देण्यास सुरूवात केली. एकीकडे पीक संकटात आणि दुसरीकडे बँंका कर्ज देत नाही. या चक्रव्यूहात अडकलेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यादेख पीक करपत आहे. अशा व्दिधा स्थितीत अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्यास सुरूवात केली आहे. यातून चालू खरीप हंगामात शेतकरी आत्महत्येचा आलेख वाढत आहे.भारतीय पर्जन्यमान विभागाने एक अहवाल प्रसिद्ध केला. त्यात राज्यातील २४ जिल्ह्यांमध्ये पाण्याच्या बाबतीत ‘रेड अलर्ट’ जाहीर करण्यात आला. यात सर्वात कमी पावसाची नोंद यवतमाळ जिल्ह्यात करण्यात आली. यवतमाळ जिल्ह्यात एकूण पर्जन्यमानाच्या तुलनेत ५४ टक्के कमी पाऊस झाला. अशीच स्थिती इतरही जिल्ह्यांची आहे. परिणामी जुलै अखेरपर्यंत ७६ टक्केच पेरण्या पूर्ण झाल्या. २४ टक्के क्षेत्रात अद्याप पेरणी झाली नाही. ही बाब कृषी विभागानेच कबूल केली आहे.यावर्षी आजपर्यंत राज्यातील ३६ लाख हेक्टरवर पेरणी झाली नाही. आता उशिरा पाऊस बरसला तरी कपाशी, सोयाबीन या मुख्य पिकांऐवजी शेतकऱ्यांना मका, तूर अशा दुय्यम पिकांची पेरणी करावी लागणार आहे. यामुळे संपूर्ण कुटुंब शेतीवरच अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. यामुळे शेतकरी चिंताक्रांत आहे. सर्वाधिक पाऊस बरसणारा महिना म्हणून जुलै आणि आॅगस्टकडे पाहिले जाते. मात्र यावर्षी २४ जिल्ह्याकडे जुलैमध्येही पावसाने पाठ फिरविली. परिणामी राज्यातील प्रकल्पांमध्ये केवळ ३५० टीएमसी पाणी शिल्लक आहे. हा साठा एकूण क्षमतेच्या केवळ २५ टक्के आहे. पुणे आणि मुंबईमधील काही धरणे वगळता इतरत्र पाण्याचा पत्ता नाही.सहा महिन्यात १३०० शेतकऱ्यांनी मृत्युला कवटाळलेसततची नापिकी व दुष्काळी स्थितीमुळे गेल्या सहा महिन्यात राज्यातील १३०० शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. अमरावती विभागात सर्वाधिक ४६३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. औरंगाबाद विभागात ४३४ शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली. अमरावती विभागात सर्वाधिक शेतकरी आत्महत्यांची नोंद बुलडाणा जिल्ह्यात झाली आहे. या जिल्ह्यात १३४, अमरावती १२२, तर यवतमाळ जिल्ह्यात ११३ शेतकऱ्यांनी आतमहत्या केली. बीड ९६, अहमदनगर ७१, उस्मानाबाद ६६, तर औरंगाबाद जिल्ह्यात ६३ शेतकरी आत्महत्यांची नोंद आहे.आठ दिवसानंतर खरीप कर्ज वितरण थांबणारदुष्काळी स्थितीने कर्जाची परतफेड करू न शकलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्याचा अध्यादेश शासनाने काढला. तो राज्यस्तरीय बँकर्स कमिटीला पाठविला. मात्र राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखा कर्ज पुनर्गठनास तयार नाही. तशा तक्रारी शेतकऱ्यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्या. आता खरीप कर्ज वितरणासाठी ३१ जुलैची अंतिम मुदत आहे. त्यानंतर कर्ज वितरण थांबणार आहे. तथापि राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्ज वितरण अद्यापही ३० टक्केपेक्षा पुढे सरकले नाही. यामुळे पुढील आठ दिवसात उर्वरित कर्ज वितरण होईल काय, असा प्रश्न आहे.
राज्यातील २४ जिल्ह्यांमध्ये पाणीबाणी; शेतकरी आत्महत्यांचा आलेख वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 3:04 PM
निसर्गाच्या लहरीपणाने राज्यातील २४ जिल्ह्यांमध्ये पाणीबाणी निर्माण झाली आहे. या जिल्ह्यांमध्ये आत्तापर्यंत तब्बल ५४ टक्के पावसाची तूट निर्माण झाली आहे.
ठळक मुद्देपावसात ५४ टक्के तूट पिकांची स्थिती दयनीय