पालकमंत्र्यांकडे धाव : रोहयोच्या कामात जेसीबी वापरल्याची तक्रार यवतमाळ : रोजगार हमी योजनेतून पांदण रस्त्याचे काम करताना निकष डावलून जेसीबीचा वापर करण्यात आला. मात्र, त्यातून निकृष्ट पांदण रस्ता तयार करण्यात आला. आता या रस्त्यामुळे शेतात पाणी शिरून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत पीडित शेतकऱ्यांनी पालकमंत्री संजय राठोड यांना निवेदन देऊन कारवाई आणि भरपाईची मागणी केली आहे. यवतमाळ तालुक्यातील कारेगाव येथील शेतकरी गणेश पवार आणि गणेश राऊत यांच्या शेतात पाणी शिरून मोठे नुकसान झाले आहे. गेल्या दोन तीन महिन्यापूर्वी या शेताच्या पूर्व-पश्चीम दिशेला रोजगार हमी योजनेतून पांदण रस्त्याचे काम करण्यात आले. मात्र हा रस्ता जेसीबी मशीद्वारे तयार करण्यात आला. सदर रस्ता बनविण्यासाठी मजुरांचा वापर करण्यात आला नाही, असे शेतकऱ्यांच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मजुरांना रोजगार मिळावा म्हणून रोहयो राबविली जाते. इथे मात्र मजुरांना डावलून जेसीबी मशीनद्वारे काम करण्यात आल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे. मात्र यंत्राने काम करूनही रस्ता निकृष्ट झाला आहे. या निकृष्ट पांदण रस्त्यामुळे संततधार सुरू असलेल्या पावसाचे पाणी आजूबाजूच्या शेतात घुसले आहे. संपूर्ण शेत खरडून गेले आहे. यंदाच्या हंगामात सोयाबीन, कापूस, तूर यांची लागवड केली होती. मात्र पाणी घुसल्याने पिकांचे पूर्णत: नुकसान झाले आहे. लागवडीसाठी पीककर्ज घेतले होते. मात्र आता प्रत्येकी पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसान भरपाई तत्काळ देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शिवाय पांदण रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष करणाऱ्या गटविकास अधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी करण्यात आली आहे. मागणीचे निवेदन पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांनाही देण्यात आले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
निकृष्ट पांदण रस्त्यामुळे शेतात शिरले पाणी
By admin | Published: August 13, 2016 1:35 AM