लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील अभूतपूर्व पाणीटंचाईचा विस्फोट झाला असून संतप्त झालेल्या नागरिकांनी भोसा रोड आणि आर्णी मार्गावरील वडगाव येथे रविवारी सकाळी चक्काजाम केला. भोसा येथे टायर पेटवून तर वडगावात रस्त्यावर ठाण मांडून वाहतूक रोखून धरली. यावेळी लोकप्रतिनिधींसह पालकमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.शहरातील भोसा परिसरात पाण्याची भीषण स्थिती निर्माण झाली. महिनाभरापासून टँकर आले नाही. त्यामुळे या भागातील महिला संतप्त झाल्या. भोसा बायपासवर रविवारी सकाळी ९ वाजता टायर पेटवून रस्ता रोको सुरू केला. वाहनाच्या दोन्ही बाजूला लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना समजाविण्याचा प्रयत्न केला. परंतु कुणीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते, केवळ पाण्याची मागणी आंदोलक करीत होते. तब्बल तीन तासानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.आर्णी मार्गावरील वडगाव येथील नगरपरिषदेच्या विभागीय कार्यालयासमोर सकाळी १० वाजतापासून महिलांच्या पुढाकारात चक्काजाम सुरू करण्यात आला. वडगाव परिसरात ५० हजार लोकसंख्या आहे. या भागासाठी दहा टँकर देण्यात आले. परंतु दिवसभरात एका टँकरच्या दोन फेऱ्या होतात. त्यामुळे पाणी मिळणे कठीण झाले. अनेक भागात तर टँकरच पोहोचत नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आंदोलनाचा पावित्रा घेतला. महिलांनी गुंड, भरणे, बकेटा रस्त्यावर ठेऊन तब्बल तीन तास वाहतूक रोखून धरली. यावेळी आंदोलकांची समजूत काढण्यासाठी तहसीलदार सचिन शेजाळ, नगरपरिषद मुख्याधिकारी अनिल अढागळे, जीवन प्राधिकरणाचे अभियंता राजेंद्र अजापुंजे यांना पाचारण करण्यात आले. आंदोलनकर्ते कुणाचेही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. या आंदोलनात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण देशमुख, नगरसेवक बबलू देशमुख, संजय लंगोटे, अरुण राऊत, रजनी देवकते, दिनेश गोगरकर, चंदू चौधरी, श्रीहरी कोत्तावार, भय्यासाहेब जगताप यांच्यासह शेकडो स्त्री-पुरुष सहभागी झाले होते. यावेळी पालकमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. दारू दिली, चकना दिला आता पाणी द्या... पाणी द्या... अशा घोषणा दिल्या जात होत्या. पाणी प्रश्नावर चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर आंदोलन मागे घेतले.प्राधिकरण अभियंत्यावर हात उगारलापाणी टंचाईच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी जीवन प्राधिकरणाचे अभियंता आंदोलन स्थळी आले. त्यावेळी आपली भूमिका मांडत असताना एका संतप्त आंदोलकाने अभियंत्याच्या चक्क हात उगारला. त्यामुळे आंदोलनस्थळी गोंधळ निर्माण झाला होता.रुग्णवाहिकेला करून दिली वाट मोकळीवडगाव येथे चक्काजाममुळे वाहतूक ठप्प झाली होती. कुणालाही रस्ता पार करू दिला जात नव्हता. त्याच वेळी एक रुग्णवाहिका आली. क्षणाचाही विलंब न लावता आंदोलनकर्त्यांनी रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करून देत माणुसकीचा प्रत्यय दिला. त्यानंतर मात्र पुन्हा रस्ता बंद करण्यात आला.आंदोलकांवर गुन्हाभोसा आणि वडगाव येथे पाण्यासाठी आंदोलन करणाऱ्या तब्बल दीडशे नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. भोसा येथे आंदोलन करणारे अभिमान वाटगुरे, कुणाल वाटगुरे, साजीद खान, गजानन वाटगुरे, अलका वाटगुरे, रेखा मुंडे, सुशीला पातालबंसी यांच्यासह १०० ते १२५ नागरिकांवर गुन्हा नोंदविला. तर वडगाव येथे आंदोलन करणारे प्रवीण देशमुख, अरुण राऊत, संजय लंगोटे, दिनेश गोगरकर, सपना लंगोटे, राजू केराम, बबलू देशमुख, चंद्रशेखर चौधरी, विजय काळे, चंदा ठाकरे, लता लसवंते, संगीता मानकर, अनिता सोनटक्के, माया वानखडे, ललिता पाईकराव, गजानन मोखळकर यांच्यासह २५ ते ३० आंदोलनकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यवतमाळात पाण्याचा विस्फोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 11:19 PM
शहरातील अभूतपूर्व पाणीटंचाईचा विस्फोट झाला असून संतप्त झालेल्या नागरिकांनी भोसा रोड आणि आर्णी मार्गावरील वडगाव येथे रविवारी सकाळी चक्काजाम केला. भोसा येथे टायर पेटवून तर वडगावात रस्त्यावर ठाण मांडून वाहतूक रोखून धरली. यावेळी लोकप्रतिनिधींसह पालकमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
ठळक मुद्देनागरिक रस्त्यावर : भोसा रोड, वडगाव येथे चक्काजाम, टायर पेटविले