फोटो
उमरखेड : यावर्षी इसापूर धरण १०० टक्के भरले आहे. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून पैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. त्यामुळे धरणातून नदीत पाणी सोडावे, अशी मागणी राष्ट्रीय किसान मोर्चाने केली आहे.
पैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडल्यामुळे नदी तिरावरील अनेक गावांतील नागरिकांना व जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. त्यातच उन्हाच्या तीव्रतेमुळे पाणीटंचाईची तीव्रता उग्ररूप धारण करू शकते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या कोट्यातून इसापूर धरणातील आरक्षित पाणी साठ्यातून १० दलघमी पाणी सध्या चालू असलेल्या कालव्याच्या सिंचन पाण्यासोबतच तात्काळ पैनगंगा नदी पात्रात सोडावे, अशी मागणी करण्यात आली.
जिल्हा प्रशासनाने विशेष बाब म्हणून नदीकाठच्या गावांना पिण्याच्या पाण्यात दरवर्षी पाणीपट्टीसाठी कायमस्वरूपी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही राष्ट्रीय किसान मोर्चाचे प्रदेश कोषाध्यक्ष चक्रधर पाटील-देवसरकर, श्रीधर केशवराव देवसरकर यांनी निवेदनातून उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली आहे.