लोकप्रतिनिधी उदासीन : १८ कोटींची कामे अद्याप प्रलंबितपुसद : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी राज्यभरात सुरू असलेल्या जलयुक्त शिवार अभियानाला पुसद तालुक्यात थंडा प्रतिसाद मिळाला आहे. २०१५-१६ या वर्षात १८ कोटींची कामे करावयाची असताना साडेतीन कोटीच्या कामांना मंजूरी मिळाली. त्यातही आर्थिक वर्ष संपत आले एकही काम सुरू नाही. मार्चपर्यंत कामे पूर्ण होतील का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.राज्य सरकारने डिसेंबर २०१४ मध्ये जलयुक्तशिवार अभियानाला सुरुवात केली. कृषी, वन, जिल्हा परिषद, सामाजिक वनीकरण, सिंचन विभागासह इतर विभागांकडून कामांची मागणी करून जिल्ह्यातील आवश्यक त्या ठिकाणी जलस्त्रोतांचे सक्षमीकरण करण्याचे काम सुरू केले आहे. पुसद तालुक्यातील १४ गावांमधील ५९ कामांचे नियोजन प्रशासनाने केले आहे. सदर कामे २०१५-१६ या वर्षात करावयाची आहे. या कामावर १८ कोटी रुपये खर्च होणार आहे. साडेतीन कोटीच्या कामांनाच मंजुरात मिळाली असली तरी अद्याप कोणत्याही कामाला सुरुवात झाली नाही. त्यामुळे शासनाने ज्या हेतुने जलयुक्त शिवार योजना राज्यात राबविणे सुरू केले आहे, तो हेतू साध्य होण्यामध्ये अडचण निर्माण होत आहे. पुसद तालुक्यात नानंद (ईजारा), माणिकडोह, पिंपळगाव (ईजारा), पारवा खु, हर्षी, दहीवड, खर्षी, खडकदरी, मांडवी, आसोली, बेलगव्हाण, आसारपेंड, पिंपळगाव या गावांमध्ये २०१५-१६ या वर्षात जलशिवाराची ५९ कामे करण्यासाठी १८ कोटीच्या प्रस्तावाला मंजुरात दिली आहे. योजनेतून निधी उपलब्ध नाही. त्या गावातील कामे नरेगाच्या माध्यमातून करण्यात यावी असा प्रशासकीय आदेश आहे. मात्र राज्य शासन प्रस्तावाच्या घोषणा करते. वर्ष संपत आले तरी त्या प्रस्तावातील कामांना पूर्णत: मंजुरात मिळत नाही. (तालुका प्रतिनिधी)
जलयुक्त शिवार थंडबस्त्यात
By admin | Published: January 07, 2016 3:02 AM