टँकरची मागणी : मोलमजुरी सोडून पाण्यासाठी करावी लागतेय भटकंती लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : धामणगाव मार्गावरील मोहा परिसराला पाणीटंचाईच्या चांगल्याच झळा पोहचत आहेत. आदिवासी बहुल लोकसंख्या असलेल्या मूळ मोहा गावाला ज्या विहिरीवरून पाण्याचा पुरवठा केला जातो, त्या विहिरीने तळ गाठल्याने नागरिकांना पाणी मिळत नाही. परिणामी मजुरी सोडून अनेकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र या ठिकाणी आहे. शहराला लागून असलेल्या मोहा, मासोळी, जामडोह, ऊकांडा पोड, लोखंड बर्डी, करंजडोह यासोबतच चांदोरे नगर, गिरजा नगर, सुरेश नगर हा संपूर्ण परिसर पूर्वी मोहा ग्रामपंचायतमध्ये येत होता. आता हा परिसर यवतमाळ नगर परिषदेअंतर्गत येतो. दरवर्षीच उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये या संपूर्ण परिसरात पाण्याचे दुर्भिक्ष असते. नगर परिषदेमध्ये हा भाग विलिन झाल्यामुळे आपल्याला उन्हाळ्यात पाणी मिळेल, अशी आशा येथील रहिवासी जनतेची होती. परंतु ती फोल ठरली. मे महिन्यात पाणीटंचाई परिसरात जाणवत आहे. मागील वर्र्षिच्या तुलनेत मात्र ती कमी असल्याचे नागरिक सांगतात. काही भागात तीव्र पाणीटंचाई आहे तर काही भागात कमी आहे. परंतु नगर परिषदेकडून टँकरही सुरू करण्यात आलेले नाही. मोहा या मूळ गावाला पूर्वीच्या एका विहिरीवरून पाणीपुरवठा होतो. काही लोकांकडे मजीप्राचे नळ आहेत. परंतु या विहिरीनेही तळ गाठल्याने एक ते दोन दिवस आड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे नळ या परिसरात बोटावर मोजण्याइतपत नागरिकांकडेच आहे. ज्यांच्याकडे आहे त्यांनाही आवश्यक ते पाणी मिळत नसल्याचे सांगण्यात आले. आदिवासी बहुल लोकसंख्या असलेल्या पोडांवर प्राधिकरणाचे नळ नाही. परंतु बोअरवेल व विहिरींद्वारा पाणीपुरवठा करण्यात येतो. उन्हाळ्यातील मे महिन्याच्या तीव्र तापमानात पाण्याच्या स्त्रोतांनी तळ गाठल्याने बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या काही प्रमाणात का होईना पाणी मिळत आहे. परंतु पाऊस लांबल्यास हे संकट अधिक गडद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मोहा परिसराला पाणीटंचाईच्या झळा
By admin | Published: May 24, 2017 12:35 AM