सुरेंद्र राऊत।ऑनलाईन लोकमतयवतमाळ : शहरासह जिल्ह्यात यावर्षी भीषण पाणीटंचाई निर्माण झाली. त्यामुळे आता नागरिकांना पाण्याचे महत्त्व कणू लागले. हीच संधी पाणी संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी असून टंचाई काळात तात्पुरत्या उपाययोजनेसह पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्याकरिता दीर्घकालीन उपाययोजना राबविण्यावर भर राहणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा यांनी सांगितले.संकटाकडे संधी म्हणून पाहिल्यास त्यावर हमखास मात करता येते, अशी धारणा व्यक्त करीत त्यांनी नैसर्गिक साधन संपत्तीने संपन्न यवतमाळ जिल्ह्यात जलसंवर्धनाची कामे दुप्पट वेगाने करण्याची संधी मिळाल्याचे स्पष्ट केले. पाणीटंचाई निवारणासाठी प्रशासकीय यंत्रणा व गाव पातळीवरील ग्रामस्थ यांनी समन्वय ठेवून ‘मिशन मोड’वर काम करणे आवश्यक आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात मानवासोबतच पाळीव प्राण्यांची तहान भागविण्याचा प्रश्न असतो. त्यामुळे या ठिकाणी दुर्गम भागातील वाड्या, पोड, वस्त्या, गावांत पाणी पोहोचविण्याचे आव्हान आहे. कृती आराखड्यानुसार अंमलबजावणी केल्यास या टंचाईची तीव्रता बºयाच अंशी कमी करता येऊ शकेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.दुष्काळी स्थितीत प्रकर्षाने कोणत्या भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवते, यावर लक्ष केंद्रीत करून जलसंवर्धनाचे उपक्रम राबविता येऊ शकतात. त्याकरिता जिल्ह्यातील ४८ ग्रामपंचायतींनी पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतल्याचे शर्मा यांनी सांगितले. जिल्ह्यात हमखास पाऊस होतो. केवळ या पावसाच्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. त्यासाठी शासकीय योजना आणि लोकसहभागाची सांगड घालून उपक्रम राबविण्यावर भर दिला जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या शेततळे, जलयुक्त शिवार, गाळमुक्त जलाशय, यासारख्या योजना मिशन मोडवर राबविण्याचे नियोजन केले जात असल्याचे जलज शर्मा यांनी सांगितले.तूर्तास १५ टँकर सुरूसध्या जिल्ह्यात १५ टँकर सुरू असून १२५ विहिरी अधिग्रहित केल्या गेल्या. १३९ गावांत या योजनेच्या माध्यमातून पाणी पोहोचविले जात आहे. तात्पुरत्या उपाययोजनेत ९०३ गावांमध्ये पाणीटंचाई उद्भवू शकते, हे हेरुन दहा कोटी ७९ लाखांचा टंचाई आराखडा तयार आहे. मागणीनुसार पाणी व टँकरची व्यवस्था केली जाणार आहे. अधिग्रहित जलस्रोतातील पाण्याची जैविक व रासायनिक तपासणी करण्यात येत आहे. योग्य ती तपासणी केल्यानंतरच पाणी पिण्यासाठी वापरण्यात येत आहे. ज्या ठिकाणी फ्लोराईडची समस्या आहे, तेथे डीएफयू मशीन लावून फ्लोराईडचे प्रमाण कमी केले जात आहे.वॉटर कप स्पर्धेत सहभागजिल्ह्यात ११९८ ग्रामपंचायतीअंतर्गत २२ लाख ६० हजार लोकसंख्या येते. दोन हजार २७४ गावे असून एक हजार ११० पाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहेत. २६ योजना बंद आहेत. पाच हजार ३११ सार्वजनिक विहिरी असून ९७२ विहिरी कोरड्या पडल्या आहेत. सात हजार ५०९ हातपंपांपैकी एक हजार ८८ हातपंप बंद आहे. २८८ विद्युत पंप सुरू आहेत. २२ विद्युत पंप बंद आहेत. टंचाई निवारणासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना प्रस्तावित केल्या जात आहेत.
पाणीटंचाई ही जलव्यवस्थापनाची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2018 11:11 PM
शहरासह जिल्ह्यात यावर्षी भीषण पाणीटंचाई निर्माण झाली. त्यामुळे आता नागरिकांना पाण्याचे महत्त्व कणू लागले.
ठळक मुद्देजलज शर्मा : तात्पुरत्या उपाययोजनेसह दीर्घकालीन कामांवर भर