लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : तालुक्यातील ७० गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. माणसासह जनावरांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. पंचायत समिती आणि तहसील कार्यालय पाणीटंचाईसाठी उपाययोजना करताना दिसत नसल्यामुळे या गावातील महिला घागर मोर्चे घेऊन थेट बीडीओच्या कक्षात येत आहेत.तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या फुलसावंगी या दहा हजार लोकसंख्येच्या गावात जनता पाण्यासाठी व्याकुळ आहे. शासनाने नामधारी टँकर दिला. ते दिवसभरात एकच खेप आणत असल्यामुळे अर्धे गाव तहानलेले आहे. स्थानिक प्रशासन पाणीटंचाईवर साधी मलमपट्टी करत असल्याने पंचायत समिती प्रशासनाविषयी प्रचंड रोष निर्माण झाला आहे. याचा उद्रेक होऊ नये म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक स्वप्नील नाईक यांनी पुढाकार घेऊन टँकरव्दारे मोफत पाणीपुरवठा सुरू केला आहे.मुडाणा, डोंगरगाव येथील महिला घागर मोर्चा घेऊन बीडीओंच्या कक्षात आल्यामुळे प्रशासनाची हतबलता चव्हाट्यावर आली आहे. डोंगरगाव, मुडाणा, दगडथर, मोरथ, वाकोडी, इजनी, हिवरा, धनोडा, कासोळा, बोथा, सेनंद, बेलदरी, टेंभूरदरा, माळवागद, मोहदी, पोखरी, तुळशीनगर, साई, घोनसरा, शिरमाळ, नांदगव्हान, करंजखेड, अंबोडा, आमणी, भांब, वरोडी, कासारबेहळ, पिंपळगाव, टेंभी, राहूर, बिजोरा, घाणमुख, करंजी, पेढी, काऊरवाडी आदी गावात भीषण टंचाई निर्माण झाली आहे. प्रशासनाने लवकरच उपाययोजना न केल्यास मोठा जनक्षोभ उफाळण्याची भीती आहे.अधर पूसचे पाणी नदीपात्रात सोडाफुलसावंगी, टेंभुरदरा येथे टँकर सुरू आहे. परंतु पाणीपुरवठा कमी पडत आहे. अन्य गावातील पाणीटंचाई दिवसेंदिवस गंभीर होत असतानाच जनावराना पाणीच मिळत नाही. अधर पूस प्रकल्पातील पाणी नदी पात्रात सोडण्याची मागणी गावागावातून होत आहे.
महागाव तालुक्यातील ७० गावात पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 10:13 PM
तालुक्यातील ७० गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. माणसासह जनावरांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. पंचायत समिती आणि तहसील कार्यालय पाणीटंचाईसाठी उपाययोजना करताना दिसत नसल्यामुळे या गावातील महिला घागर मोर्चे घेऊन थेट बीडीओच्या कक्षात येत आहेत.
ठळक मुद्देप्रशासन हतबल : नागरिकांचे मोर्चे धडकतात तहसीलवर