रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : निसर्गाचा लहरीपणा, शेतमालास न मिळणारे दर आणि नवीन तंत्रज्ञानाचा अभाव यामुळे शेती व्यवसाय घाट्यात आला आहे. या दुष्टचक्रात गुरफटलेले शेतकरी आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहे. या संघर्षमय शेतीचे चित्र पालटावे म्हणून अरविंद उद्धवराव बेंडे यांनी जीवाचे रान केले. घाट्यातली शेती नफ्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. तंत्रज्ञानासोबत नवीन प्रयोगाची जोड दिली. यातून शेतीचा चेहरामोहरा बदलला. घाट्यात गेलेली शेती त्यांनी नफ्यात आणली आहे. हे यशस्वी प्रयोग पाहून राज्य शसनाने अरविंद बेंडे यांना वसंतराव नाईक शेतकरी कृषीभूषण पुरस्कार जाहीर केला आहे.कृषी पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने कृषी पुरस्कार जाहीर केले आहेत. यवतमाळ तालुक्यातील रातचांदना गावाचे शेतकरी अरविंद उद्धवराव बेंडे यांना २०१६ चा वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन पुरस्कार जाहीर करण्यात आला. बेंडे यांच्याकडे पूर्वी चार एकर शेती होती. या शेतशिवारात संपूर्ण कुटुंब राबत होते. परंपरागत पीक घेतले जात होते. मात्र निसर्गाचा लहरीपणा आणि शेतमालास न मिळणाऱ्या दरामुळे पेरणीचा खर्च निघणेही अवघड झाले होते. यामुळे बेंडे यांनी शेती सोडण्याचा निर्णय घेतला होता. याचवेळी ते रावेरी कृषी विद्यापीठात शेडनेट प्रशिक्षणाला गेले. तेथून त्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली.शेडनेट हाउसमुळे उत्पन्नात दुप्पट वाढ होणार आणि शेतीची सुरक्षा होणार याची हमखास खात्री होती. यासोबत पीक पद्धती बदलणे गरजेचे होते. यामुळे त्यांनी शेतामधील पीक पद्धती बदलविली. आता ते २४ एकर शेत पाहातात. शेतीला दुग्ध व्यवसायाची जोड दिली. यासोबत शेणखताचा आणि धरणातील गाळाचा त्यांनी वापर केला आहे. गोमूत्राने शेतशिवार सुपीक झाले आहे. विशेष म्हणजे, साडेचार एकर शेडनेट आणि ड्रिपसोबत मल्चींगची व्यवस्थाही त्यांनी केली आहे. निसर्गाच्या लहरीपणाने उत्पादनाला फटका बसतो. मात्र शेडनेटमुळे हे नुकसान कमी करता आले, असे ते म्हणाले.त्यांनी आपल्या शेतात शिमला मिरची, टमाटर, वांगे, भेंडी, साधी मिरची, काकडी आणि दोडक्याचे पीक घेतले आहे. उत्पादित भाजीपाला उपराजधानीपर्यंत ते पाठवितात. त्यांना २४ एकरात २४ लाखांचे उत्पन्न झाले. तर १४ लाख रुपये उत्पादनखर्च आला. १० लाख रूपयाचा नफा झाला. याकरिता परंपरागत पीक पद्धती बदलावी लागली. सोबत पाण्यासारखा पैसा खर्च करावा लागला. विशेष म्हणजे, वेळेवर सर्व कामे करावी लागली. यानंतरच पीक दिसत आहे. शेतकºयांनी पीक पद्धती बदलवून प्रक्रिया उद्योगावर भर द्यावा. शेतीला जोडधंदा असावा आणि वेळच्या वेळी कामे व्हावी, असे मत त्यांनी व्यक्त केले.एकत्र कुटुंब पद्धतीनेच हे यश मिळाल्याचे ते सांगतात. त्यांची आई निर्मला बेंडे, शशिकला बेंडे, भाऊ राजेंद्र आणि राम यांची त्यांना शेतीत मोलाची मदत आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या पत्नी मंगला बेंडे, वहिणी अरूणा आणि सुषमा याही शेतात राबतात. सर्वांच्या परिश्रमासोबत काटकसरीने शेतीचा विकास साधता आला, असे मत अरविंद बेंडे यांनी ‘लोकमत’कडे नोंदविले.राज्यपाल, मुख्यमंत्र्यांनी घेतली दखलअरविंद बेंडे यांच्या शेतात दररोज शेकडो शेतकरी भेटी देतात. त्यांच्या यशाचे गणित जाणून घेतात. त्यांच्या शेताला तत्कालीन राज्यपाल एस. सी. जमीर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेकांनी भेटी दिल्या. १ जुलै २००९ रोजी त्यांना शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार मिळाला, २००८ मध्ये राज्यपालांनी उत्कृष्ठ गोपालक पुरस्कार देऊन गौरविले. २०११ मध्ये पुसदच्या वसंतराव नाईक प्रतिष्ठानचा उत्कृष्ठ शेतकरी पुरस्कार मिळाला आहे.
तोट्यातील शेती आणली नफ्याच्या वाटेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2019 9:43 PM
निसर्गाचा लहरीपणा, शेतमालास न मिळणारे दर आणि नवीन तंत्रज्ञानाचा अभाव यामुळे शेती व्यवसाय घाट्यात आला आहे. या दुष्टचक्रात गुरफटलेले शेतकरी आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहे. या संघर्षमय शेतीचे चित्र पालटावे म्हणून अरविंद उद्धवराव बेंडे यांनी जीवाचे रान केले.
ठळक मुद्देमेहनतीवर शासनाच्या कृषीभूषण पुरस्काराची मोहोर : शेडनेट, ड्रिप, सोलर पंपाच्या जोरावर आमूलाग्र क्रांती