अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनामुळे शाळा बंद झाल्यावर आता मोबाईलवर शिकवण्याची शक्कल लढविली जात आहे. पण गोरगरिबांच्या पोरांजवळ मोबाईल नाही. त्यांच्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी सोप्पी-सोप्पी पद्धत शोधली अन् त्यातून गावोगावी-घरोघरी शिक्षण पोहोचविण्याची धडपड सुरू केली आहे. ‘माझे घरच माझी शाळा’ हा त्यांचा उपक्रम सध्या शेकडो गरीब मुलांसाठी उपयुक्त ठरत आहे.
घरातले विविध पारंपरिक खेळ खेळत मुलांना अभ्यासक्रमातील संज्ञा समजावून सांगण्यासाठी याद्वारे प्रयत्न केला जात आहे. कोरोनाच्या कचाट्यात अडकलेले शिक्षण मुलांपर्यंत पोहोचविणारा हा प्रयत्न कळंब तालुक्यातील सुकळी येथील संदीप कोल्हे या तरुण शिक्षकाने केला आहे. विशेष म्हणजे, हा उपक्रम केवळ सुकळी गावापुरता मर्यादित न राहता कळंब तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यासह परजिल्ह्यातील अनेक गावांतही पालकप्रिय झाला आहे.
खास पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी या उपक्रमाची रचना केल्याचे संदीप कोल्हे म्हणाले. मात्र सर्वच प्राथमिक वर्गाच्या विद्यार्थ्यांना तो उपयुक्त ठरणारा आहे. यात ‘मराठी भाषेचे मुलभूत वाचन आणि गणित संबोध स्पष्ट करणे’ या दोन बाबींवर भर देण्यात आला आहे. कोरोनामुळे घराबाहेर पडणे कुणालाच शक्य नाही. त्यामुळे घरात राहूनच बाबांच्या सोबत आणि बाबांच्या सहकार्याने मुलांनी शिक्षण घ्यावे, त्यात शिक्षकाची भूमिका मार्गदर्शकाची असावी, अशा पद्धतीने हा उपक्रम राबविला जात आहे. हसत खेळत घरातल्या सुरक्षित वातावरणात शिक्षण मिळत असल्याने मुलेही आनंदी आहेत.
अशी भरतेय घरातल्या घरात सुरक्षित शाळाशिक्षक संदीप कोल्हे हे अभ्यासक्रमातील ठराविक संज्ञा एखाद्या पारंपरिक खेळाच्या स्वरुपात सादर करतात. त्याचे चित्र तयार करतात, व्हीडीओ तयार करतात, ते स्वत:, मित्रांच्या मदतीने, इतर शिक्षकांच्या मदतीने पालकांपर्यंत पोहोचवितात. ते चित्र किंवा व्हीडीओ पाहून पालक संबंधित खेळ आणि पुस्तक सोबत घेऊन आपल्या मुलांना शिकवितात. ३० जूनपासून सुरू असलेल्या या प्रकारात कोरोनाच्या एकांतवासातील कंटाळा घालविण्यासोबतच आनंददायक शिक्षणही मिळत आहे.
साध्या एसएमएसमधून येळाबारात शिक्षण!अनेक पालकांकडे ऑनलाईन शिक्षणासाठी अॅन्ड्रॉईड फोन नाही. पण साधा फोन आहे. हीच बाब लक्षात घेऊन येळाबारा जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक शिवचंद्र गिरी यांनी ‘एसएमएस अभ्यास’ उपक्रम सुरू केला आहे. पालकांचा एसएमएस ग्रूप बनवून ते त्यावर पुस्तकातील ठराविक भाग पाठवितात, त्याद्वारे पालकांनी अभ्यास घ्यायचा अन् नंतर त्याचा फिडबॅक एसएमएसद्वारेच द्यायचा असा हा उपक्रम आहे. ‘वर्ग पहिला, पान नंबर १२ वरील रेषा गिरवा, इंग्रजी- पान ७ वरील वस्तू ओळखून त्याला काय म्हणतात ते सांगा.’ असा होमवर्क सुरू आहे.