लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यवतमाळच्या विकासाबाबत नेहमीच संवेदनशील असतात. मग तो वर्धा-यवतमाळ- नांदेड रेल्वेचा विषय असो, अथवा येथील औद्योगीकरणाचा. गुरुवारी स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा यांच्या स्मृतिदिनी आयोजित शाळा इमारतीच्या लोकार्पण कार्यक्रमातही नाट्यगृहासह शिक्षण, आरोग्याबाबतचे प्रश्न उपस्थित केले. अखेर पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी विविध प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही देतानाच यवतमाळच्या नाट्यगृहासाठी पाच कोटींचा निधी देऊन दोन वर्षांत नाट्यगृह सुरू करू, अशी घोषणा केली. गुरुवारी जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूल इमारतीच्या लोकार्पणाचा सोहळा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत मातोश्री दर्डा लॉनवर पार पडला. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह पालकमंत्री संदीपान भुमरे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात विजय दर्डा यांनी यवतमाळकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न मांडले. समृद्धी महामार्ग जिल्ह्याच्या जवळून जातोय. यवतमाळकर समृद्धीसाठी तरसतोय. हा मार्ग जिल्ह्याशी जोडल्यास रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होऊन जिल्हा विकासाच्या मार्गावर येईल. त्यामुळे यासाठी प्रयत्नांची गरज व्यक्त केली. संस्कृतीविना समाज नसतो, असे सांगत सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना यवतमाळसाठी विशेष बाब म्हणून नाट्यगृह मंजूर केले हाेते. या नाट्यगृहासाठी खास डिझाइनलाही मंजुरी मिळविली. तत्कालीन सांस्कृतिकमंत्री विलासराव देशमुख यांनी असे नाट्यगृह लातूरलाही व्हावे, अशा शब्दांत येथील नाट्यगृहाच्या डिझाइनचे कौतुक केले होते. मात्र, आज १८ वर्षे उलटली तरी नाट्यगृहाचे काम रेंगाळलेलेच आहे. या नाट्यगृहात स्थानिक कलाकारांचा परफॉर्मन्स आम्हाला कधी दिसणार, असे विचारत, नाट्यगृह पूर्णत्वास आणण्यासाठीचे आदेश देण्याची मागणी त्यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे केली. नाट्यगृहाबरोबरच यवतमाळच्या पायाभूत सुविधांचेही विविध प्रश्न आहेत. शिक्षणासह आरोग्याचे प्रश्नही साेडविले पाहिजेत. येथे वैद्यकीय महाविद्यालय असले तरी सर्वसामान्यांना उपचारासाठी नेहमीच अडचणींचा सामना करावा लागतो. याकडे त्यांनी लक्ष वेधले. लोकप्रतिनिधींनी मालमत्ता जाहीर करावी, असा आदेश आहे, तसाच आदेश सर्व स्तरांतील लोकप्रतिनिधींनी सरकारी रुग्णालयातच उपचार घ्यावेत, असा काढायला हवा. तसे झाले तरच येथील आरोग्यव्यवस्था सुधारेल, मी खासगी रुग्णालयांच्या विरोधात नाही. मात्र, यवतमाळला स्टेट नर्सिंग महाविद्यालय दिल्यास दिलासा मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.विजय दर्डा यांनी उपस्थित केलेल्या विविध मागण्यांनंतर भाषणासाठी उभे राहिलेल्या पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी मागील काही महिन्यांत यवतमाळच्या विकासासाठी केलेल्या कार्याचा आढावा मांडला. नाट्यगृहाची नुकतीच पाहणी केली असून, लवकरच पाच कोटींचा निधी देऊन पुढील दोन वर्षांत हे नाट्यगृह कार्यान्वित करू, असे सांगितले. जिल्ह्याला ५० पेक्षा जास्त रुग्णवाहिका दिल्या असून, सामान्य रुग्णालयासाठी सव्वाशे कोटीचा निधी मंजूर केला आहे. जागेचा प्रश्न कालच मार्गी लावल्याचे सांगत लवकरच हे रुग्णालय उभे राहील, असा शब्द दिला.
राज्यपाल म्हणाले, ‘लेकी बोले, सुने लागे’- विजय दर्डा यांनी राज्यपालांकडे यवतमाळच्या विकासाबाबतचे विविध प्रश्न मांडले. पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी या सर्व प्रश्नांची दखल घेत त्याबाबतची घोषणाही भाषणातून केली. याच मुद्द्यावर भाष्य करताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले की, यवतमाळचे प्रश्न माझ्याकडे विजय दर्डा यांनी मांडले असले तरी मी काही करू शकत नाही, हे त्यांनाही माहीत आहे. मात्र, ‘लेकी बोले, सुने लागे’ अशा तऱ्हेने हे प्रश्न सरकार दरबारी पोहोचविण्यासाठी त्यांनी मांडले. त्यावर उपस्थित असलेल्या पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी पाच कोटींच्या निधीची तत्काळ घोषणाही केली आहे. विजय दर्डा यांनी मांडलेला नर्सिंग महाविद्यालयाचा विषय ते विसरले असतील; परंतु पालकमंत्री तेही काम करतील, असा विश्वास आहे, असे सांगत गडकरी यांच्याशी तुमचे चांगले संबंध आहेत. तुम्ही त्यांच्या शेजारीच राहता, त्यामुळे त्यांच्यामार्फतही यवतमाळच्या विकासाचे काही प्रश्न मार्गी लावू शकता, असेही राज्यपाल कोश्यारी यांनी विजय दर्डा यांना सांगितले.