लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील गुन्हेगारी टोळ्यांमध्ये धुसफूस सुरू आहे. नवोदितांंकडून हत्यारांची खरेदी केली जाते. याचाच व्यावसायिक लाभ घेण्याच्या उद्देशाने पोलीस रेकॉर्डवर नोंद असलेल्या इरफान ऊर्फ लेंडी याने चाकूंचा साठा गोळा केला. स्थानिक गुन्हे शाखेला माहिती मिळताच सोमवारी रात्री त्याच्याकडून तब्बल १३ चाकू जप्त करण्यात आले.इरफान ऊर्फ लेंडी अली बरकत अली (४८), असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. त्याचा सहकारी विशाल रामटेके (१९) हा पसार झाला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील गुन्हेगारी टोळ्यांच्या हालचालीवर लक्ष केंद्रीत केले आहे. येथील सक्रिय गुन्हेगारांना घातक शस्त्रे कुठून मिळतात, त्याचा व्यवसाय कोण करतो, यावर पोलिसांचा वॉच आहे. यातूनच कुख्यात इरफान लेंडी याच्याकडे शस्त्रसाठा असल्याची माहिती मिळाली. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखा पथकातील सहायक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने सापळा रचून धाड घातली.इरफान लेंडीच्या घराची झडती घेतली असता एका स्पोर्ट बॅगमध्ये चाकू आढळले. या कारवाईदरम्यान त्याचा साथीदार विशाल रामटेके पसार होण्यात यशस्वी झाला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात शस्त्रास्त्र प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला. या गुन्ह्याचा पुढील तपास शहर ठाण्यातील शोध पथकाकडे देण्यात आला. शस्त्रास्त्र खरेदी-विक्रीचे रॅकेट उघडकीस आणण्यासाठी पोलिसांनी अटकेतील इरफान लेंडी याला पोलीस कोठडी देण्याची मागणी न्यायालयात केली. न्यायालयाने इरफान लेंडीला २५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर अधीक्षक नुरूल हसन, एलसीबीचे प्रमुख प्रदीप शिरसकर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.
‘लेंडी’च्या घरून शस्त्रसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 21:08 IST
शहरातील गुन्हेगारी टोळ्यांमध्ये धुसफूस सुरू आहे. नवोदितांंकडून हत्यारांची खरेदी केली जाते. याचाच व्यावसायिक लाभ घेण्याच्या उद्देशाने पोलीस रेकॉर्डवर नोंद असलेल्या इरफान ऊर्फ लेंडी याने चाकूंचा साठा गोळा केला.
‘लेंडी’च्या घरून शस्त्रसाठा जप्त
ठळक मुद्देएलसीबीची कारवाई : विक्रीच्या उद्देशाने केली होती जमवाजमव