अतुल गावंडे : उमरखेड येथे आत्माराम गावंडे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण उमरखेड : स्वातंत्र्याचा उपयोग आपण कसा करावा आणि आपल्या जबाबदाऱ्या कोणत्या, त्या कशा पूर्ण कराव्या, हे प्रत्येकाने ठरवले पाहिजे. दुसऱ्यांचे कल्याण करणे यातच आपले कल्याण असते. ज्या प्रमाणात तुमच्यात त्यागाची भावना वाढते, तेवढेच तुम्ही मोठे होता, असे उद्गार अमेरिका निवासी डॉ. अतुल गावंडे यांनी काढले. येथील गो. सी. गावंडे महाविद्यालयात स्व. डॉ. आत्मारामजी गावंडे यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी ते बोलत होते. डॉ. अतुल गावंडे यांच्या हस्ते अनावरण पार पडले. व्यासपीठावर त्यांच्या अर्धांगिणी कॅथलीन तथा मुलगी हंटर, माजी आमदार तथा अखिल कुणबी समाजाचे अध्यक्ष अॅड. अनंतराव देवसरकर, डॉ. आत्मारामजी गावंडे यांचे बंधू जयरामजी गावंडे, माजी आमदार विजय खडसे, सचिव डॉ. या. मा. राऊत, उपाध्यक्ष संभाजी नरवाडे, रामचंद्र बागल, नारायणदास भट्टड उपस्थित होते. ते पुढे म्हणाले, माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या स्वप्नांची मोठी जबाबदारी माझ्यावर आली. ते मी पूर्ण करीन. अॅड. अनंतराव देवसरकर यांनी डॉ. अतुल गावंडे यांच्या विद्वत्तेबद्दल प्रशंसोद्गार काढले. डॉ. कॅथलीन व हंटर यांनी उपस्थितांचे इंग्रजीतून आभार मानले. डॉ. अतुल गावंडे यांच्या इंग्रजीतील भाषणाचा अनुवाद प्रा. बोंपीलवार यांनी केला. प्रास्ताविक डॉ. या. मा. राऊत यांनी केले. आभार प्राचार्य वद्राबादे यांनी मानले. या प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी, प्राध्यापक वृंद, शहरातील प्रतिष्ठित नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
दुसऱ्यांच्या कल्याणातच आपलेही कल्याण
By admin | Published: February 26, 2017 1:17 AM