आर्णी (यवतमाळ) : तालुक्यातील अंतरगाव शिवारात दोन चुलतभाऊ अंघोळीसाठी नदीवर गेले होते. पाय घसरून पडल्याने त्यातील एकाचा मृत्यू झाला तर दुसरा बचावला. ही घटना गुरुवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.
आर्यन शिवाजी भोयबांड (१५) असे मृताचे नाव आहे. आर्यन आपला चुलतभाऊ रोहीन हिंमतराव भोयबांड (१७) याच्यासोबत गुरुवारी दुपारी शेतात जातो, असे सांगून घरून निघून गेला होता. शेतात पोहोचल्यानंतर काही वेळाने ते दोघेही शेतालगतच्या अरुणावती नदीवर अंघोळीसाठी गेले. नदीकाठावर उभे असताना अचानक आर्यनचा पाय घसरला. तो नदीत पडला. नदीत पाणी जास्त असल्याने व पात्र विस्तीर्ण असल्याने तो पाण्यात बुडाला. राेहणने आरडाओरडा केला; पण काहीच उपयोग झाला नाही.
रोहनने लगेच भ्रमणध्वनी करून कुटुंब व गावातील लोकांना बोलावले. मात्र तोपर्यंत वेळ झाला होता. गावकऱ्यांनी नदीपात्रात उड्या घेवून आर्यनचा शोध घेतला. अखेरीस त्याचा मृतदेहच हाती लागला. आर्यन शेतकरी कुटुंबातील असून तो आर्णी येथील भारती विद्यालयात नववीत शिकत होता. त्याच्या मागे आई, वडील, भाऊ असा आप्त परिवार आहे. त्याच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.