अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कुत्र्यापासून सावधान.. अशी पाटी घरापुढे लिहिण्याची टूम आता जुनी झाली आहे. यवतमाळात कुत्र्यांनाच घरापासून लांब ठेवण्यासाठी दारापुढे लाल बाटली ठेवण्याचे फॅड अवतरले आहे. आग पसरावी, साथीचा आजार पसरावा इतक्या झपाट्याने ही लाल बाटलीची प्रथा शहरभर पसरली आहे. मोकाट कुत्र्यांना टाळण्यासाठी नागरिक हा उपाय करीत असले तरी नगरपालिका मात्र हातावर हात ठेवून गप्प आहे.मोकाट कुत्र्यांनी घरापुढे, रस्त्यावर, अंगणात घाण करून ठेवू नये म्हणून दारात लाल बाटली ठेवली जात आहे. आर्णी मार्गावरील त्रिमूर्तीनगर, नृसिंह सरस्वतीनगर, वडगाव ग्रामपंचायतीचा परिसर, धामणगाव मार्गावरील नारिंगे नगर, चांदोरे कॉलनी, गिरिजानगर, लोहारा परिसरातील राऊतनगर, सानेगुरुजीनगर, दत्तात्रय नगर, गोधनी मार्गावरील बाजारोरिया नगर, विदर्भ हाउसिंग सोसायटीचा परिसर, सूरज नगर, इतकेच काय पांढरकवडा मार्गावरील वसाहतींमध्येही दारोदारी लाल बाटल्या लटकताना दिसत आहे.घरापुढे, दुकानांपुढे, सलूनपुढे इतकेच काय ब्यूटी पार्लरपुढेही अशा बाटल्या लटकविण्यात आल्या आहेत. नारिंगे नगरात तर चक्क तुळशी वृंदावनालाही या बाटलीचे ‘प्रोटेक्शन’ देण्यात आले आहे.बाटलीत नेमके काय?लाल रंगाचे पाणी पारदर्शक बॉटलमध्ये टाकून ती दारापुढे ठेवल्यास कुत्रे घराकडे फिरकत नाही, असा समज पसरला आहे. या बाटलीत नेमके काय टाकता, असे विचारले असता महिला म्हणतात, काहीही चालते. आम्ही तर होळीचा रंगही टाकून ठेवला आहे. कुत्र्याला फक्त रंगाची भीती आहे. नाहीतर रोज अंगणात घाण करून ठेवतो. कर्णोपकर्णी या प्रथेची माहिती पसरल्याने काही महिलांनी तर नुसते पाणीच बाटलीत भरून ठेवले आहे. यवतमाळ शहरात भररस्त्यावर मोकाट जनावरांचा ठिय्या असतो. त्याविरुद्ध ओरडून नागरिक थकले. मोकाट कुत्र्यांचा वॉर्डा-वॉर्डात सुळसुळाट आहे. त्यांना हाकलून-हाकलून नागरिक थकले आहे. पण नगरपालिका प्रशासनाने त्यावर उपाय केला नाही. शेवटी शेजाऱ्यांनी केले म्हणून मीही करून बघतो, या न्यायाने नागरिकांनी दारापुढे लाल बाटली ठेवून कुत्र्यांना आवर घालण्याचा प्रयत्न चालविला आहे. कुत्र्यांमुळे त्रस्त लोकांच्या मनात ‘कुत्ते मै तेरा खून पी जाउंगा’ अशी भावना असेल, पण बाटल्याच बाटल्या पाहून सुज्ञ माणसांच्या मनात ‘ये लाल रंग कब मुझे छोडेगा..’ हा सवाल आहे.सोशल मीडियात उलटा पुरावादारात कुत्र्याने घाण करू नये, म्हणून यवतमाळकरांनी दारापुढे लाल बाटली ठेवली. मात्र नेमक्या आशाच बाटलीवर कुत्रा लघुशंका करीत असल्याचा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे, एका जानकार डॉक्टरने तो फॉरवर्ड केल्याने यवतमाळकरांच्या अंधश्रद्धेचा पुरावा ठरला आहे. पण बाटल्या जैसे थे आहेत. माणूस प्रयत्न करून थकला की कुठल्यातरी अज्ञात उपायांकडे आकर्षित होतो. त्यातलाच हा प्रकार.कुत्र्यांना ‘कलर व्हीजन’ नसते -डॉ. राजीव खेरडेकुत्र्यांना टाळण्यासाठी लाल बाटली ठेवणे ही पूर्णत: अंधश्रद्धा आहे. त्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. यवतमाळप्रमाणेच नागपूर, अमरावतीतही हा प्रकार घडत आहे. सुशिक्षित लोकही याच्या आहारी गेले आहे. प्रत्यक्षात कुत्र्यांना ‘कलर व्हीजन’ (रंगांचे ज्ञान) नसते. केवळ ‘इमेज’ कळते. त्यामुळे रंग पाहून कुत्रे दूर कसे जातील? खरे म्हणजे, मोकाट कुत्र्यांना आवर घालणे हे नगरपालिकेचे काम आहे. मोकाट कुत्रे, जनावरे यांचा पालिकेने बंदोबस्त करावा, असे मत जिल्हा पशूसंवर्धन अधिकारी डॉ. राजीव खेरडे यांनी व्यक्त केले.
ही तऱ्हा कुठली... दारोदारी लाल बाटली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2019 6:00 AM
दारात कुत्र्याने घाण करू नये, म्हणून यवतमाळकरांनी दारापुढे लाल बाटली ठेवली. मात्र नेमक्या आशाच बाटलीवर कुत्रा लघुशंका करीत असल्याचा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे, एका जानकार डॉक्टरने तो फॉरवर्ड केल्याने यवतमाळकरांच्या अंधश्रद्धेचा पुरावा ठरला आहे. पण बाटल्या जैसे थे आहेत. माणूस प्रयत्न करून थकला की कुठल्यातरी अज्ञात उपायांकडे आकर्षित होतो. त्यातलाच हा प्रकार.
ठळक मुद्देहतबल नागरिक अंद्धश्रद्धेच्या आहारी : मोकाट कुत्र्यांना टाळण्यासाठी शक्कल, नगरपालिकेचे दुर्लक्ष