गल्लोगल्ली अतिक्रमण : वणीतील मोजकेच अतिक्रमण काढले, उर्वरित अतिक्रमण कायमचवणी : शहरात अतिक्रमणात सतत वाढ होत असताना ते हटविण्यासाठी अद्याप नगरपरिषदेला मुहूर्त सापडत नाही. मंगळवारी केवळ विकास कामांत अडथळा ठरणारे अतिक्रमण हटविण्यात आले. त्यामुळे आता सर्व अतिक्रमण हटविण्यासाठी नगरपरिषद कधी पुढाकार घेणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.वणी शहराचा दिवसेंदिवस विस्तार होत आहे. कोळसा खाणींमुळे शहराची बरकत वाढली आहे. परिणामी लोकसंख्या फुगत आहे. त्याचा परिणाम शहरातील वास्तव्यावर होत आहे. आता नव्याने अनेक ले-आउट पडले. तेथे अनेकांनी घरे बांधली. तरीही शहरातील घरांवर ताण पडत आहे. त्यातून अतिक्रमणाची समस्या वाढत आहे. नागरिकांना राहायला घर नसताना दुकानदार दुकानासमोर अतिक्रमण करून शहरातील रस्ते अरूंद करीत आहेत. त्याचा विपरित ताण वाहतुकीवर होत आहे. दोन वर्षांपूर्वी शहरातील काही मार्गाने एकेरी वाहतूक सुरू झाली. अतिक्रमणामुळे ही एकेरी वाहतूक वादात सापडली होती. अखेर ती कशी तरी सुरू झाली. पोलिसांनी आधी अतिक्रमण हटवा, अशी भूमिका त्यावेळी घेतली होती. ती भूमिका रास्त होती. त्यामुळे त्यावेळी नगरपरिषदेने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली. मात्र चारच दिवसांत ती गुंडाळण्यात आली होती. तेव्हापासून अतिक्रमण हटव मोहीम थंडावली आहे. ती अद्याप कायम आहे. दरम्यान मंगळवारी विकास कामांत अडथळा ठरणारी अतिक्रमणे काढण्यात आली. तेवढ्यावरची ही मोहीम पुन्हा थांबली आहे. आता अतिक्रमणधारक चांगलेच शिरजोर झाले आहे. अनेकांनी आपली दुकाने पुन्हा पूर्वीच्या ठिकाणी थाटली आहेत. आता हे अतिक्रमण वाहतुकीस अडसर ठरत आहे. अनेक चौकांत वाहतुकीची कोंडी होत आहे. रस्ते अरूंद असल्याने अतिक्रमणाने ते पुन्हा लहान झाले आहे. त्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत. संबंधित अतिक्रमण हटवून एकेरी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. मात्र अतिक्रमण हटाव मोहिमेला मुहूर्तच मिळत नसल्याने ही समस्या अद्याप कायमच आहे. किमान टिळक चौक, आंबेडकर चौक, महाराष्ट्र बँंक, टागोर चौक, तुटी कमान, दीपक टॉकिज, साई मंदिर, सर्वोदय चौक, आदी ठिकाणचे अतिक्रमण काढणे गरजेचे आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
अतिक्रमण हटावला मुहूर्त कधी मिळणार ?
By admin | Published: March 17, 2016 3:09 AM