तालुक्यातील मोहदा येथे नवीन पोलीस ठाणे मंजूर होऊन जवळपास सहा वर्षे होत आहे. मात्र नवीन पोलीस ठाण्याची अद्याप निर्मिती झालीच नाही. परिणामी तालुक्यातील १२५ गावांच्या नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी केवळ पांढरकवडा पोलीस ठाण्यातील सात अधिकारी व ५६ कर्मचाऱ्यांच्या भरवशावर आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
१४ ऑगस्ट २०१४ रोजी पांढरकवडा येथील नवीन पोलीस वसाहतीच्या उद्घाटनासाठी तत्कालीन गृहमंत्री दिवंगत आर. आर .पाटील आले होते. त्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील वणी (ग्रामीण), लोहारा, वसंतनगर (पूसद) आणि तालुक्यातील मोहदा असे चार नवीन पोलीस ठाणे मंजूर झाल्याची माहिती दिली होती. हे चारही पोलीस ठाणे लवकरच सुरू होतील, असेही त्यांनी सांगितले होते. मात्र अद्यापही या पोलीस ठाण्यांची निर्मिती झाली नाही. तालुक्यात दरवर्षी गुन्ह्यांमध्ये वाढ होत असून, गेल्या दहा वर्षांच्या गुन्हेगारीचा आलेख थक्क करणारा आहे, असे असताना एक लाख ५० हजार लोकसंख्येच्या सुरक्षेचा डोलारा केवळ येथील ६३ पोलिसांवर आला आहे. तालुक्यात १२४ गावे आहेत. क्षेत्रफळाने ही तालुका मोठा आहे. पूर्व आणि पश्चिम भागातील दोन टोकावरील गावाचे अंतर ४० ते ५० किलोमीटर आहे. तालुक्यातील ३० ते ४० टक्के भाग जंगलांनी व्यापला आहे. तालुक्याच्या मध्यभागापासून चौपदरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ जातो. या भागातील जमीन मध्यम प्रतीची आहे. सिंचनासाठी सायखेड सोडले तर कोणतेही मोठे धरण नाही. लहान-मोठे दहा-बारा तलाव व पाझर तलाव आहेत. परंतु सिंचन क्षमता कमी आहे. त्यामुळे जास्तीत जास्त जमीन कोरडवाहू आहे. हा तालुका आर्थिक शैक्षणिक तसेच सांस्कृतिकदृष्ट्या मागासलेला आहे. मोहदा हे तालुक्यातील सर्वांत मोठे गाव आहे. परिसरात अनेक अवैध व्यवसायांनी डोके वर काढले आहे. त्यामुळे शांतता व सुव्यवस्था धोक्यात आली असून, मोहदा येथे ग्रामीण पोलीस ठाणे लवकरात लवकर व्हावे, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
बॉक्स : दोन हजार नागरिकांच्या मागे केवळ एक पोलीस पांढरकवड्यात आज घडीला ६३ पोलीस कार्यरत आहे. त्यात दहा महिला पोलीस, तीन सहायक पोलीस निरीक्षक, चार उपनिरीक्षक, १३ हेडकॉन्स्टेबल ३७ शिपाई, एक निरीक्षक असे कर्मचारी कार्यरत आहे. ठाण्यात ६३ अधिकारी कर्मचारी कार्यरत असले तरी त्यातील अनेक जण कोर्ट ड्युटी समन्स वॉरंट देण्यासाठी पाठविले जातात. मंत्री व्ही.आय.पी.च्या दौऱ्यासाठीही यातील कर्मचारी पाठविले जातात. त्यामुळे अपुऱ्या कर्मचाऱ्यांच्या भरोशावर पोलीस ठाण्याचे काम सुरू आहे. दोन हजार नागरिकांच्या मागे केवळ एक पोलीस उपलब्ध होतो. तीन शिफ्टचा विचार केल्यास एका शिफ्टला सहा हजार नागरिकांमागे एका केवळ एक पोलीस सुरक्षेला उपलब्ध होतो.