लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : तब्बल १२ वर्षे पोटच्या लेकरासारखे सांभाळलेल्या टमू नावाच्या माकडाला वनविभागाने अचानक त्याच्या आईपासून हिरावून नेले. त्याबाबत ‘लोकमत’ने ‘लाडका टमू आईला मुकला.. पिंजऱ्यात अडकला’ असे वृत्त प्रकाशित करताच समाजमन हळहळले. आता खुद्द पालकमंत्र्यांनीच टमूला ताबडतोब त्याच्या ‘आई’कडे सोपवा, असे आदेश उपवनसंरक्षकांना दिले. त्यामुळे मायलेकराचा साडेतीन महिन्यांचा विरह संपण्याची चिन्हे आहेत.काय आहे टमूची कहाणी? १२ वर्षांपूर्वी यवतमाळ-आर्णी मार्गाने प्रवास करत असताना यवतमाळच्या नीलिमा सवईकर यांनी एक अपघात डोळ्यादेखत पाहिला. भरधाव ट्रकखाली एक गर्भवती माकडीण चिरडली. ते पाहून निलिमाताई थांबल्या. माकडीणीच्या पोटातून बाहेर आलेली आतडी हलताना त्यांना दिसली. जवळ जाऊन पाहिले तर गर्भातून बाहेर पडलेला छोटा जीव त्यांना दिसला. माकडीणीचं ते बाळ निलिमाताईनी लगेच यवतमाळात आणलं. स्वत:च्या घरी त्याची शुश्रूषा सुरू केली. तीन वर्षे डॉ. अलोणे यांच्याकडून उपचार करवून घेतले. बरा होता होता आणि मोठा होता होता हा वानर सवईकर कुटुंबाचाच एक सदस्य बनला. त्याने वानरांची दुनियाच पाहिली नाही. पाहिले ते माणसांचेच कुटुंब.
माणसाळलेला टमू
टमूने माकडांचे जगच पाहिले नाही. तो पूर्णत: माणसाळलेला आहे. सवईकर कुटुंबीयांच्या सहवासाविना तो जेवतही नाही. अशा टमूला मार्च महिन्यात वनविभागाने अचानक हिरावून नेले. काही दिवस यवतमाळात आणि नंतर वर्ध्याच्या प्युपिल्स रेस्क्यू सेंटरमध्ये त्याला ठेवण्यात आले आहे. पण नीलिमा सवईकर, त्यांचा मुलगा प्रतिक यांनी ‘टिफिन’ नेल्याशिवाय टमू काहीही खात नाही.वनविभागाने त्याला पिंजऱ्यात ठेवले असून त्याला जंगलात सोडण्याच्या हालचाली आहेत. मात्र, तो माकडांना घाबरतो, जंगलात तो जगूच शकणार नाही, त्याच्या जीवनाची दोन-तीन वर्षे उरली आहेत, ते आयुष्य त्याला आमच्यासोबतच सुखाने जगू द्या, अशी मागणी नीलिमा सवईकर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पालकमंत्री मदन येरावार यांना निवेदन दिले. पालकमंत्र्यांनी यवतमाळच्या उपवनसंरक्षकांना सविस्तर लेखी आदेश देऊन टमूला नीलिमा सवईकर यांच्या ताब्यात देण्याचे निर्देश दिले आहेत. बाबा आमटे यांच्या आनंदवनात शासनाने वन्यप्राणी ठेवण्याची मुभा दिली, त्याच धर्तीवर नीलिमा सवईकर यांना न्याय द्यावा, असे या आदेशात म्हटले आहे. आता या आदेशावर वनविभाग काय भूमिका घेतो, याकडे सवईकर कुटुंबीयांचे लक्ष लागले आहे.मुख्यमंत्री, वनमंत्र्यांनाही पत्रशिवाय, यवतमाळच्याच अरविंद झाडे यांनी मुख्यमंत्री, वनमंत्री, केंद्रीय गृह राज्यमंत्री, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, वर्ध्याचे वनसंरक्षक आदींना पत्र पाठवून टमूला सोडण्याची कळकळीची विनंती केली आहे. ‘लोकमत’ वृत्ताचा हवाला देत त्यांनी हे पत्र पाठविले असून आईसाठी तडफडत टमूचा मृत्यू झाल्यास वनविभागाचा कायदा जिंकेल पण माणुसकी मरेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.