यवतमाळ : एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात आठ टक्के वाढ करण्याची घोषणा सरकारने केली. यावर एक महिन्याचा कालावधी लोटला तरी अंमलबजावणी झालेली नाही. परिणामी, कर्मचाऱ्यांचे दरमहा अडीच ते चार हजार रुपयांचे नुकसान होत आहे. वाढ लागू करून सणासुदीच्या दिवसात आर्थिक हातभार लावावा, अशी अपेक्षा ८५ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना आहे.
सद्य:स्थितीत ३४ टक्के भत्ता
महामंडळ कर्मचाऱ्यांना सद्य:स्थितीत ३४ टक्के महागाई भत्ता दिला जात आहे. यात वाढ करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. ४२ टक्के भत्त्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अलीकडेच बैठक घेतली.
संघटनेच्या शिष्टमंडळाशी चर्चा करताना त्यांनी आठ टक्के वाढ देण्याचे मान्य केले. सप्टेंबर पेड इन ऑक्टोबरमध्ये ही वाढ दिली जाईल, असे सांगण्यात आले होते.
अडीच ते चार हजार जास्त
ऑक्टोबरच्या वेतनात मिळणाऱ्या वाढीकडे सर्व कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले होते. परंतु, या कर्मचाऱ्यांची निराशा झाली. आठ टक्के वाढ मिळाल्यास प्रत्येक कर्मचाऱ्याला दरमहा अडीच ते चार हजार रुपये जास्त मिळतील.