लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गेल्या १५ दिवसांपासून जिल्ह्यात गोवर-रूबेला लसीकरण सुरू आहे. प्रत्येक शाळेत १०० टक्के लसीकरणाचे टार्गेट ठेवण्यात आले आहे. तरीही आॅनलाईन नोंदींमध्ये मात्र केवळ ५९ हजार विद्यार्थ्यांनाच लसीकरण झाल्याची नोंद करण्यात आल्याने संभ्रम वाढला आहे. उर्वरित ४ लाख मुलांना लस देण्यात आली की नाही, याबाबत थेट शिक्षण आयुक्त स्तरावरून आता विचारणा केली जात आहे.२०२० पर्यंत गोवर-रुबेला या आजारांचे देशातून समूळ उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. त्यासाठी २७ नोव्हेंबरपासून लसीकरण मोहीम सुरू आहे. ९ महिने ते १५ वर्ष या वयोगटातील मुलांना लस दिली जात आहे. या वयोगटात जिल्ह्यात साधारण ८ लाख मुले-मुली आहेत. त्यातील ४ लाख ६० हजार ३६ मुले जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये पहिली ते दहावीमध्ये शिकत आहेत. त्यांच्या लसीकरणाची नोंद शाळेने ‘सरल’ प्रणालीत करण्याचे निर्देश आहेत. प्रत्यक्षात शाळांकडून अत्यल्प नोंदी झाल्याने शाळांमध्ये १०० टक्के लसीकरण झाले की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.आरोग्य विभाग आणि शिक्षण विभागाच्या सहकार्याने शाळांमध्ये लसीकरण केले जात आहे. लसीकरणानंतर सरलमध्ये नोंदीची जबाबदारी शाळांची आहे. शाळांनी १३ डिसेंबरपर्यंत केवळ ५९ हजार ३०३ विद्यार्थ्यांना लसीकरण झाल्याची नोंद केली आहे.त्या हिशेबाने जिल्ह्यात लसीकरणाचे काम केवळ १५ टक्के झाल्याचे स्पष्ट होत असल्याने आयुक्तांनी गंभीर दखल घेतली आहे. मोहिमेचा अर्धा कालावधी संपलेला असताना अद्याप ३ लाख ९२ हजार ५२४ विद्यार्थ्यांना लसीकरण झाल्याची नोंद नाही. आता हे लसीकरणच झालेले नाही, की केवळ नोंदी झालेल्या नाही, हा प्रश्न शिक्षण विभाग आणि आरोग्य विभागासाठी डोकेदुखी ठरणार आहे.आठ हजार मुले लसीकरणातून सुटलीचशाळांनी आतापर्यंत केवळ ६७ हजार ५१२ विद्यार्थ्यांबाबत आॅनलाईन नोंदी केल्या आहेत. त्यात ५९ हजार ३०३ विद्यार्थ्यांना लस दिल्याचे म्हटले आहे. तर ८ हजार २०९ विद्यार्थी लसीकरणातून सुटल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, ज्या ३ लाख ९२ हजार ५२४ विद्यार्थ्यांच्या कोणत्याच प्रकारच्या नोंदी नाही, त्यांच्याबाबत नेमके काय घडले, या प्रश्नाचे उत्तर प्रशासनाला द्यावे लागणार आहे.लसीकरणातून सुटलेले तालुकानिहाय विद्यार्थी८ हजार विद्यार्थ्यांना लसीकरण झालेले नाही, अशी आॅनलाईन नोंद विविध शाळांनी केली आहे. त्यामध्ये आर्णी तालुक्यात ३६ विद्यार्थी वंचित राहिले. बाभूळगावात ८६, दारव्हा ४३२, दिग्रस ७३०, घाटंजी १९५, कळंब ६३, महागाव २३५५, मारेगाव २२०, नेर २७९, पांढरकवडा २९१, पुसद ८७२, राळेगाव ४३, उमरखेड १०८२, वणी ४३६, यवतमाळ ९४९, तर झरी तालुक्यात १४० विद्यार्थी लसीकरणातून सुटले आहेत.
चार लाख मुलांना लसीकरण झाले की नाही?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 11:45 PM
गेल्या १५ दिवसांपासून जिल्ह्यात गोवर-रूबेला लसीकरण सुरू आहे. प्रत्येक शाळेत १०० टक्के लसीकरणाचे टार्गेट ठेवण्यात आले आहे. तरीही आॅनलाईन नोंदींमध्ये मात्र केवळ ५९ हजार विद्यार्थ्यांनाच लसीकरण झाल्याची नोंद करण्यात आल्याने संभ्रम वाढला आहे.
ठळक मुद्देगोवर-रुबेला मोहीम : साडेचार लाख मुलांपैकी केवळ ५९ हजारांचीच नोंद