अकोला बाजार (यवतमाळ) : महालक्ष्मी पुजनाच्या कार्यक्रमासाठी घराच्या छतावर मंडप उभारताना विजेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू, तर त्याचा मित्र जखमी झाला. ही घटना वडगाव (पो.स्टे.) ता.यवतमाळ येथे घडली. खुशाल पुंडलिक गावंडे (२४) रा. वडगाव, असे मृताचे नाव आहे. विकास अनंता गेडाम (२५) हा जखमी आहे.
वडगाव येथील इंदिरानगर वस्तीत खुशालचे काका नामदेव गावंडे यांच्या घरी महालक्ष्मी पूजनाचा कार्यक्रम होता. पावसाची रिपरिप सुरू असल्याने २१ सप्टेंबर रोजी नामदेव गावंडे यांच्या घराच्या स्लॅबवर खुशाल गावंडे व त्याचा मित्र मंडप टाकत होते. घरावरून गेलेल्या विद्युत ताराला अँगलचा स्पर्श झाल्याने खुशालला विजेचा शॉक लागला. खाली कोसळल्याने त्याच्या डोक्याला जबर मार लागला. त्याला तत्काळ यवतमाळ येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मागे आई, वडील, दोन भाऊ व मोठा आप्त परिवार आहे.
खुशाल हा एमएच २९ हेल्पिंग हँडस् टीममध्ये वन्यजीव संरक्षक म्हणून काम करीत होता. सामाजिक कार्यात तो नेहमी अग्रेसर असायचा. खुशालच्या मृत्युमुळे गणपतीचे महाप्रसाद कार्यक्रम मंडळाच्या कार्यकर्त्यांनी रद्द केले. खुशालला वाचविण्याच्या प्रयत्नात त्याचा मित्र विकास गेडाम शॉक लागून किरकोळ जखमी झाला. त्याच्यावर खासगी रुग्णालयात दोन दिवस उपचार करण्यात आले. त्याची प्रकृती बरी झाली आहे.