नव्यांची प्रतीक्षा : महसूल राज्यमंत्र्यांचा शब्द ठरणार निर्णायक रवींद्र चांदेकर यवतमाळ जिल्हा परिषदेत निवडून आलेल्या शिवसेनेच्या पाचपैकी एका महिला सदस्याला अध्यक्षपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे. परंपरेनुसार येत्या २१ मार्चला नवीन अध्यक्षांची निवड होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेची निवडणूक नुकतीच आटोपली. निकालही जाहीर झाले. मात्र मतदारांनी सत्ता स्थापनेचे त्रांगडे निर्माण करून ठेवले. मतदारांनी कोणत्याच पक्षाला बहुमत न दिल्याने सर्व पक्षांसमोर तडजोड करण्यावाचून पर्याय उरला नाही. मात्र नेमकी कोणत्या पक्षांमध्ये तडजोड, युती, आघाडी होते, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. त्यामुळे नवीन पदाधिकारी निवडीबाबत औत्सुक्य निर्माण झाले आहे. तथापि सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या शिवसेनेचाच अध्यक्ष होईल, हे मात्र जवळपास निश्चित झाले आहे. पक्षीय बलानुसार शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला. बहुमतासाठी त्यांना ११ सदस्यांची गरज आहे. हे ११ सदस्य कोणत्या पक्षाचे असतील, असा प्रश्न आहे. राज्य पातळीवरून युती घोषित झाली, तरी यवतमाळात युती होणार की नाही, असाही प्रश्न चर्चीला जात आहे. शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने तर ‘पाठीत खंजीर खुपसणाऱ्यां’सोबत निश्चितच सत्तेत जाणार नाही, असा दावा केला. यामुळे सत्ता स्थापनेची गुंतागुंत शेवटच्या क्षणापर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलेसाठी हे पद आरक्षित आहे. या प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या गटातून विजयी झालेल्याच महिलांना अध्यक्ष पदाची संधी मिळेल, की ऐनवेळी पक्षीय गणीतातून खुल्या प्रवर्गातून विजयी झालेल्या महिलेच्या गळ्यात अध्यक्ष पदाची माळ पडणार, याचे औत्सुक्य आहे. तथापि अध्यक्षपदी शिवसेनेचाच उमेदवार असणार, एवढे मात्र निश्चित. यात महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षपदी पाच महिलांपैकी कोण ?
By admin | Published: February 26, 2017 1:05 AM