यवतमाळ : पुणे येथील पूजा चव्हाण संशयित मृत्यू प्रकरणात यवतमाळातील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नाव चर्चेत आले आहे. तपासासाठी पुणे पोलिसांचे पथक यवतमाळ मेडिकलमध्ये येऊन गेले. ६ फेब्रुवारीला पहाटे ४ वाजून ३४ मिनिटांनी मेडिकलच्या प्रसूती वॉर्ड क्र. ३ मध्ये दाखल झालेली ती युवती नेमकी कोण, याचा उलगडा झालेला नाही. दाखल झालेल्या त्या युवतीचा पत्ताही नांदेड जिल्ह्यातील नोंदविण्यात आल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.वैद्यकीय महाविद्यालयातील स्त्रीरोग विभागात ६ फेब्रुवारीला पहाटे ४.३४ वाजता दाखल झालेल्या त्या २२ वर्षीय तरुणीचा गर्भपात करण्यात आला. शनिवारी दुपारी दोनपर्यंत तिच्यावर उपचार करून तिला सुटी देण्यात आली. उपचारासाठी दाखल तरुणी नेमकी कुठली, हे स्पष्ट झाले नाही. ज्या युनिट-२ मध्ये ती दाखल झाली, त्या युनिटच्या डॉक्टरांनाही याबाबत काहीच माहिती नाही. पहाटे तिला दाखल करून उपचार करणारे डॉक्टर कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गर्भपात अर्धवट अवस्थेत झाल्यानंतर दाखल तरुणीला काही तासांतच रुग्णालयातून सुटी कशी देण्यात आली, हेही एक कोडे आहे.
यवतमाळमध्ये गर्भपात केलेली ती युवती कोण?, पूजा अरूण राठाेड नावामुळे चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 2:28 AM