यवतमाळ : जग कितीही पुढे गेले तरी अजूनही बालविवाहाची समस्या संपलेली नाही. त्यामुळेच आता जिल्हा परिषदेने अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. ‘आमच्या लग्नाची घाई कशाला करता.. आम्हाला अजून शिकू द्या ना’ अशी आर्त हाक देत चिमुकल्यांनीच आईबाबांना पत्र लिहावे, असा हा उपक्रम आहे. विशेष म्हणजे, मंगळवारी याची सुरूवातही करण्यात आलीय.
कोरोनाच्या काळापासून जिल्ह्यात बालविवाहाचे प्रकार पुढे आले होते. महिला व बालविकास विभाग, जिल्हा बालसंरक्षण कक्ष आदींनी यावर वेळोवेळी कारवायादेखील केल्या. आता थेट घरोघरी याबाबत जागृती व्हावी म्हणून जिल्हा परिषदेने विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जनजागृतीचा उपक्रम हाती घेतला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. मैनाक घोष यांच्या संकल्पनेतून या ‘पत्रलेखन’ उपक्रमाचा जन्म झाला. तर प्राथमिक शिक्षणाधिकारी किशोर पागोरे यांनी मंगळवारी सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना याबाबत लेखी आदेश बजावले आहेत. ‘आई-बाबांना पत्र लिहिणे’ हा उपक्रम प्रत्येक शाळेने राबवावा, असे आदेशात म्हटले आहे.
पत्रात काय काय असेल?- सक्षम व सुदृढ पिढीसाठी कमी वयात लग्न करू नये.- कमी वयातील लग्नामुळे शिक्षणाची संधी हिरावली जाते.- विशेषत: मुलींच्या शिक्षणाला खिळ बसते.- आम्हाला शिकू द्या, शिकून समृद्ध होऊ द्या.- आम्हाला देशाचा मजबूत स्तंभ बनू द्या.- त्यानंतरच आमचे लग्न करा.
साध्या पोस्टकार्डद्वारे बालविवाह रोखण्याचा संदेश विद्यार्थी पालकांना देतील. प्रत्येक तालुक्यात एक विद्यार्थी आणि एक विद्यार्थिनी यांचा अशाच प्रकारचा संदेश देणारी व्हीडिओ क्लीप तंत्रस्नेही शिक्षकांच्या माध्यमातून तयार केला जाईल. त्याला तारे जमीपर, आशाये, उडाणा अशा अनुरूप गाण्याची जोड देऊन त्यातून प्रभावी जनजागृतीचा प्रयत्न केला जाईल.- किशोर पागोरे, शिक्षणाधिकारी, यवतमाळ