यवतमाळ : खातेदाराने वारंवार मागणी केली. बँकेकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर ग्राहक आयोगात तक्रार दाखल करण्यात आली. निकाल ग्राहकाच्या बाजूने लागला. बँकेला दंड ठोठावण्यात आला. नेर येथील राम माधवराव हळदे यांनी दाखल केलेल्या प्रकरणात हा निकाल देण्यात आला आहे. हे प्रकरण त्यांनी वकिलाकडे न देता आयाेगापुढे स्वत: आपली बाजू मांडली.
राम हळदे यांचे युनियन बँक ऑफ इंडियाच्या नेर येथील शाखेत खाते आहे. पासबूक गहाळ झाल्याने त्यांनी बँकेकडे नवीन पासबुकाची मागणी केली. यासाठी प्रत्यक्ष आणि पोस्टाद्वारे अर्ज करूनही त्यांना तातडीने नवीन पासबूक दिले नाही. या प्रकारात त्रास होत असल्याने त्यांनी यवतमाळ जिल्हा ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली. युनियन बँक ऑफ इंडिया मुख्य व्यवस्थापक मुंबई आणि नेर शाखा व्यवस्थापक यांना गैरअर्जदार करण्यात आले.
यवतमाळ जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष नंदकुमार वाघमारे, सदस्य ॲड.हेमराज ठाकूर यांच्या उपस्थितीत या तक्रारीवर सुनावणी झाली. यामध्ये बँकेने हळदे यांना सदोष सेवा दिल्याचे स्पष्ट झाले. अर्ज केल्यानंतर तब्बल १६ दिवसांनी पासबुकची दुय्यम प्रत देण्यात आली. या सर्व प्रकारात हळदे यांना मनस्ताप झाला, अडचणींना तोंड द्यावे लागले, असे नमूद करत आयोगाने बँकेला दंड ठोकला आहे.
शारीरिक व मानसिक त्रासापोटी एक हजार आणि तक्रारीच्या खर्चाचे एक हजार रुपये बँकेने तक्रारदाराला द्यावे, असा आदेश देण्यात आला. बँकेचे मुख्य व्यवस्थापक आणि नेर शाखा व्यवस्थापकांनी वैयक्तिकरित्या संयुक्तपणे ही रक्कम द्यायची आहे. या निर्णयामुळे बँकेला चपराक बसली आहे.