उमरखेड : वनसंपत्तीने नटलेल्या पैनगंगा अभयारण्यात असलेले वन्यप्राणी आता शिकाऱ्यांच्या निशाण्यावर आहेत. मोर, हरीण, रोही आदी प्राण्यांची शिकार करून मांसाची विक्री खुलेआम केली जात आहे. होळीपूर्वी मोराची शिकार करण्याचा प्रयत्न झाला होता. वाघ, बिबट्यांसारखे हिंस्त्र प्राणी कमी झाल्याने शिकारी बिनधास्त अभयारण्यात शिरत असल्याची माहिती आहे. मात्र वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी याकडे दुर्लक्ष करीत आहे. विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवर पैनगंगा अभयारण्या आहे. मौल्यवाण सागवानासह या जंगलात विविध पशूपक्षी आहेत. वाघ-बिबट, हरीण, रोही, मोर, ससे, रानडुक्कर, तितर, बटेर, पाणकोंबड्या यासह विविध प्रजातीचे पशूपक्षी आहेत. सागवान तस्कर मोठ्या प्रमाणात जंगलात शिरतात. जंगल तोडतानाच वन्यप्राण्यांची शिकार करतात. पैनगंगा अभयारण्यात गेल्या काही वर्षात हिंस्त्र प्राण्यांची संख्या कमी होत चालली आहे. त्यामुळे शिकाऱ्यांचे चांगलेच फावत आहे. वाघ, बिबट्यासारखे प्राणी जंगलात असले की शिकारी जंगलात शिरायला मागेपुढे पाहतात. मात्र आता या प्राण्यांची संख्या अल्प झाल्याने बिनधास्तपणे जंगलात शिरून हरीण, राही, मोर, तितर, बटेर आदींची शिकार करीत आहे. नदीच्या तिरावर प्राणी पाणी पिण्यास येतात म्हणून शिकारी त्याठिकाणी आपले जाळे टाकूण असतात. पाणी पिण्यासाठी आलेले प्राणी अलगद जाळ््यात अडकतात. विशेष म्हणजे राष्ट्रीय पक्षी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोराच्या शिकारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. होळीपूर्वी दराटी जंगलात जखमी असवस्थेतील एक मोर आढळून आला होता. या मोराची शिकार करण्यासाठी त्यावर हल्ला करण्यात आला होता. सुदैवाने त्या मोराच्या पायाला दुखापत झाली. वनविभागाने किनवटच्या पशूचिकित्सालयात मोरावर उपचार केले. मात्र याबाबत परिसरात उलटसूलट चर्चा सुरू आहे. तीन मोरांची शिकार झाली असून, एक मोर शिकाऱ्यांच्या तावडीतून सुटल्याने तो नागरिकांच्या ताब्यात आला. नागरिकांनी त्याला वनविभागाच्या सुपूर्द केले. दररोज या भागात मोराची शिकार केली जात आहे. यासोबतच हरीण आणि इतर प्राण्यांचीही शिकार केली जाते. स्थानिकांच्या मदतीने होणाऱ्या शिकारीचे मांस शहरातील हॉटेल आणि धाब्यावर विकले जाते, तर अनेकदा जंगलामध्ये पार्टी केली जाते. तेलंगाणातील तस्कर याभागात शिरून तस्करी करीत आहेत. मात्र वनविभागाचे कर्मचारी जंगलात जायला घाबरतात. ही मानसिकता ओळखूनच वन्यजीवांची शिकार केली जात आहे. शिकाऱ्यांवर अटकाव आणला नाही तर किलबिलाट नष्ट होण्याची भीती आहे. (शहर प्रतिनिधी)
वन्यप्राणी शिकाऱ्यांच्या निशाण्यावर
By admin | Published: March 08, 2015 2:09 AM