लोकमत न्यूज नेटवर्कवणी : यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने जानेवारी महिन्यातच जंगलातील पाणवठे आटले असून त्यामुळे वन्यजीव पाण्याच्या शोधात भटकत रस्त्यावर येत आहेत. यामुळे अपघाताची शक्यता वाढली असून या वन्यजीवांच्या शिकारीही केल्या जात आहे. असे असले तरी वनविभाग मात्र याविषयात अद्यापही गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.वन्यजीव जंगलाबाहेर पडू नये, यासाठी वनविभागाच्यावतीने वणी, झरी व मारेगाव तालुक्यातील जंगलामध्ये कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले. मात्र देखभाल व दुरूस्तीअभावी या पाणवठ्यांची अतिशय दुरावस्था झाली आहे. या पाणवठ्यांमध्ये नियमीत पाण्याची व्यवस्था केली जाते की नाही, हादेखिल संशोधनाचा विषय ठरला आहे. वणी, झरी व मारेगाव या तीन तालुक्यांमध्ये वन्यजीवांची संख्या मोठी आहे. त्यात वाघ, हरिण, मोर, ससे, रोही, रानडुकरे, निलगाय, यांची संख्या मोठी आहे. दिवसेंदिवस ही संख्या झपाट्याने वाढत असल्याने या वन्यजीवांच्या सुरक्षेबाबतची चिंता वाढली आहे.पाण्याच्या शोधात वन्यजीव अनेकदा लोकवस्त्यांकडे धाव घेतात. त्यातून मानव-वन्यजीव संघर्षाची ठिणगी पडते. हा संघर्ष टाळण्यासाठी वनविभागाकडून कोणत्याही उपायययोजना गांभीर्याने केल्या जात नसल्याचे दरवर्षीच दिसून येते. परिणामी गेल्या काही वर्षात झरी व वणी तालुक्यात व्याघ्र हल्ल्यामध्ये अनेकांचे निष्कारण बळी गेले आहेत. पांढरकवडा वनपरीक्षेत्रात जवळपास २६ वाघ आहेत. त्यातील अनेक वाघ झरी परिसरातील जंगलांमध्ये भटकत असतात.शिकार व पाण्याच्या शोधात अनेकदा हे वाघ लोकवस्त्यांपर्यंत पोहोचतात. त्यातून व्याघ्र हल्ले झाल्याचा इतिहास आहे. जंगलात असलेल्या पाणवठ्यांची व्यवस्थित देखभाल झाल्यास मानव-वन्यजीव संघर्षाला पूर्णविराम मिळू शकतो. परंतु पाणवठ्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. घोन्सा ते झरी मार्गावर अनेकदा वन्यजीवांचे दर्शन होते. या भागात मोरांची संख्या मोठी आहे. एकावेळी ४०-४० मोरांचा थव्वा वर्दळीच्या रस्त्यावर पाण्याच्या शोधात भटकताना अनेकदा नजरेस पडला आहे.मोर व सशांवर शिकाऱ्यांचा डोळाझरी तालुक्यातील जंगलांमध्ये मोर व सशांची संख्या मोठी आहे. या दोन प्राण्यांवर शिकाºयांचा कायम डोळा असतो. या प्राण्यांच्या मांसाला बाजारात चांगली किंमत मिळत असल्याने त्यांची शिकार करून त्याचे मांस विकण्याचा गोरखधंदाच या भागात मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. हा भाग दुर्गम असल्याने या प्रकाराकडे वनविभागाचे कायम दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. वाढत्या शिकारीमुळे प्राण्यांची संख्या कमी होण्याची भीती वन्यजीव प्रेमींमधून व्यक्त केली जात आहे.
पाणवठे आटल्याने वन्यजीव रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 12:09 AM
यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने जानेवारी महिन्यातच जंगलातील पाणवठे आटले असून त्यामुळे वन्यजीव पाण्याच्या शोधात भटकत रस्त्यावर येत आहेत. यामुळे अपघाताची शक्यता वाढली असून या वन्यजीवांच्या शिकारीही केल्या जात आहे.
ठळक मुद्देशिकारी वाढल्या : वनविभागाचे दुर्लक्ष, पाणवठ्यांचे व्यवस्थापन नाही