भाजपची घोडदौड काँग्रेस रोखणार काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 09:54 PM2019-09-21T21:54:19+5:302019-09-21T21:56:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : काँग्रेसच्या गडाला सुरुंग लावून गतवेळी पाचही जागा जिंकणाऱ्या भाजपला यावेळी ही स्थिती जैसे थे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : काँग्रेसच्या गडाला सुरुंग लावून गतवेळी पाचही जागा जिंकणाऱ्या भाजपला यावेळी ही स्थिती जैसे थे ठेवण्याचे आव्हान आहे. मात्र अनेक मतदारसंघात भाजपची ही विजयी पताका रोखण्याची व्यूहरचना काँग्रेसने केली आहे.
जिल्ह्यात वणी मतदारसंघात भाजप आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार यांच्यापुढे काँग्रेसमधून नेमके कुणाचे आव्हान राहते यावर विजयाचे गणित अवलंबून आहे. येथे वामनराव कासावार परंपरागत उमेदवार आहे. मात्र यावेळी खासदार सुरेश धानोरकर यांनी संजय देरकर हा नवा चेहरा दिल्लीत प्रोजेक्ट केला आहे. देरकर उमेदवार असल्यास काँग्रेसमधील नाराजीचा फायदा नेमका कुणाला हा प्रश्न आहे. तेथे सेनेतूनही बंडखोरीची चिन्हे आहेत. आर्णी मतदारसंघात भाजपमधीलच घटक आमदार राजू तोडसाम यांचे तिकीट कापायला निघाले आहेत. मतदारसंघातील दोन प्रमुख नेत्यांच्या इशाऱ्यावर हे तिकीट ठरणार आहे. मात्र ऐनवेळी एबी फॉर्म दुसºयाच्या हाती द्यायचा अशी या नेत्यांची व्यूहरचना आहे. येथे भाजपच्या उमेदवारापुढे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अॅड. शिवाजीराव मोघे रिंगणात राहतात की, नवा चेहरा दिला जातो हे पाहणे महत्वाचे ठरते. आदिवासी विकास मंत्री प्राचार्य डॉ. अशोक उईके यांच्यापुढे काँग्रेसचे माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंत पुरके यांचे आव्हान राहू शकते. एखादवेळी येथे काँग्रेसकडून नवा तरुण चेहरा रिंगणात उतरविला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुरके पेक्षा उईके बरे असा या मतदारसंघातील सूर आहे. पालकमंत्री मदन येरावार यांच्या यवतमाळ मतदारसंघात काँग्रेसकडून समाजातील व विविध पक्षातील घटकांची सहानुभूती असलेला चेहरा रिंगणात उतरविला जाणार आहे. शिवाय भाजपपुढे शिवसेनेच्या बंडखोरीचेही आव्हान राहणार आहे. २०१४ चा मतविभाजनाचा पॅटर्न यावेळी भाजपसाठी यशस्वी होण्याची फारशी चिन्हे नाहीत. महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या मतदारसंघात विरोधकांसाठी पक्षाचा आदेश शिरसावंद्य असला तरी ‘पैशाचा चुराडा’ निश्चित असल्याने मनापासून कुणीही लढण्यास तयार नाही. पुसद मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार मनोहरराव नाईक स्वत: लढणार नाहीत, त्याऐवजी मुलगा इंद्रनील अथवा ययाती यांना संधी दिली जाऊ शकते. मात्र ते नेमके कोणत्या पक्षाचे उमेदवार असतील हे आत्ताच सांगणे कठीण आहे. पक्षांतर झाल्यास पुसदमध्ये राष्ट्रवादीला ऐनवेळी उमेदवार शोधण्यासाठी धावाधाव करावी लागण्याची चिन्हे आहेत. तेथे उमेदवार शोधताना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार ख्वाजा बेग यांचा कस लागणार आहे. उमरखेड मतदारसंघात भाजपचे आमदार राजेंद्र नजरधने यांच्यापुढे पक्षातील प्रतिस्पर्धी इच्छुकांसह शिवसेनेतील इच्छुक डॉ. विश्वनाथ विणकरे यांचे आव्हान राहणार आहे. तेथे काँग्रेस जुनाच चेहरा देते की नवीन याकडे नजरा आहेत.
भाजपच्या दोन्ही मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
आजच्या घडीला मंत्र्यांची सर्वाधिक संख्या यवतमाळ जिल्ह्यात आहे. प्राचार्य डॉ. अशोक उईके, मदन येरावार हे दोघे भाजपचे तर प्रा. तानाजी सावंत व संजय राठोड हे शिवसेनेचे असे चार मंत्री जिल्ह्यात आहेत. यापैकी येरावार व उईके या दोन मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. उईके यांना मतदारसंघात फारसा विरोध नाही. काँग्रेसमधील पुरकेंच्या तुलनेत उईके हे ‘दगडापेक्षा विट मऊ’ ठरतात. मात्र सेनेतील बंडखोरीची तयारी व काँग्रेसचा संभाव्य स्ट्राँग उमेदवार लक्षात घेता येरावारांची दमछाक होण्याची चिन्हे आहेत. पुन्हा निवडून येणे ही या दोन्ही मंत्र्यांसाठी प्रतिष्ठेची बाब आहे. शिवसेनेचे संजय राठोड हे मतांची आघाडी एक लाखांवर नेण्याचे आपले लक्ष्य पूर्ण करतात की गतवेळपेक्षा ही आघाडी कमी होते, याकडे नजरा लागल्या आहेत. यवतमाळातून लढण्यास इच्छुक संतोष ढवळे यांची जबाबदारी ‘मातोश्री’वरून तानाजींकडे सोपविली गेली आहे.
काँग्रेसच्या दोन माजी मंत्र्यांची कसोटी
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री अॅड. शिवाजीराव मोघे व प्रा. वसंत पुरके यांना पुन्हा काँग्रेसची उमेदवारी मिळविताना प्रचंड दमछाक करावी लागत आहे. त्यासाठी मुंबई-दिल्लीच्या येरझारा करून शिष्टमंडळामार्फत शक्तीप्रदर्शन करावे लागत आहे. काँग्रेसच्या तिकिटासाठी या ज्येष्ठ नेत्यांची चांगलीच कसोटी लागत आहे.
निसटता पराभव, उत्साह कायम
यवतमाळ विधानसभा मतदारसंघात २०१४ मध्ये शिवसेनेचे संतोष ढवळे अवघ्या १२०० मतांनी पराभूत झाले. पालकमंत्री मदन येरावार यांनी त्यांचा पराभव केला. त्यावेळी नशिबाची साथ मिळाली नसली तरी संतोष ढवळे पुन्हा तेवढ्याच उत्साहाने यवतमाळ विधानसभेच्या आखाड्यात उतरण्यासाठी तयारीला लागले आहेत.
वंचित की प्रहार?
चारही प्रमुख पक्षात उमेदवारी न मिळाल्यास इच्छुकांपुढे वंचित बहुजन आघाडी किंवा प्रहार हे दोन पर्याय उपलब्ध राहणार आहे. बहुतेकांची पसंती वंचितला राहण्याची अधिक शक्यता आहे. पर्याय नसलेल्यांना प्रहारच्या आश्रयाला जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही. अन्यथा अपक्षाचा मार्ग खुला आहे.