यवतमाळ : तापमानाचा पारा पंचेचाळीस पलीकडे गेलेला असला तरी या काळात रस्त्याच्या कडेने फुललेले बहाव्याचे झुंबर पाहून आल्हाददायक अनुभव येऊ लागला आहे. पुसद बाहेर तसेच संपूर्ण तालुक्यात बहाव्याच्या झाडांना बहर आला आहे. बहाव्याची झाडे पिवळय़ा फुलांनी डवरून गेली आहेत. झाडांचा हा बहर म्हणजे पाऊस लवकर येण्याचा संकेत मानला जातो.
उन्हाळा सुरू झाला की रस्त्यारस्त्यांवर पिवळ्य़ा फुलांचा सडा पडलेला दिसतो. यात बऱ्याच ठिकाणी सोनमोहोराच्या झाडांचा सडा पडलेला असतो. मात्र यंदा पुसद परिसरात बहाव्याला चांगलाच बहर आला आहे. बहाव्याच्या पिवळ्य़ाधम्मक फुलांचा नजारा पुसदकरांनाही सुखावू लागला आहे. पुसद परिसरातील वनराईमध्ये बहाव्याची मोठ्या प्रमाणावर झाडे आहेत. या फुलांना बहर आल्यामुळे शहरापासून ग्रामीण भागात ही नेत्रसुखद असे दृश्य पाहायला मिळते. पाऊस पडण्याची चाहूल देणारे विविध वृक्ष, पक्षी असून कोकिळेचे गाणे, कावळ्य़ाने घरटे बांधण्यास सुरुवात करणे, पळस व बहावा फुलणे ही पाऊस जवळ आल्याची चाहूल मानली जात असल्याचे सांगितले.
वृक्ष हे केवळ सावलीबरोबरच ते निसर्गातील बदलांची चाहूल ही देतात. बहावा देखील त्यापैकीच एक असून त्याला ‘नेचर इंडिकेटर’ असेही संबोधले जाते. पानझड सरून आता चैत्राची पालवी फुटू लागली आहे. सावर, पळस आदी वृक्ष पानाफुलांनी बहरू लागले आहेत. मात्र पिवळ्य़ाधम्मक फुलांची माळ असलेला बहावा सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. बहावा फुलला की पाऊस जवळ आला, असे म्हटले जाते. बहावा फुलल्यानंतर साधारण ४५ ते ५० दिवसांनी पाऊस पडतो, असा संकेत असल्याचेही जाणकारांचे मत आहे.