लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दहावीनंतर व्यावसायिक प्रशिक्षण घेऊन रोजगार उपलब्ध करून देणारा अभ्यासक्रम म्हणून आयटीआयकडे पाहिले जाते. यंदा जिल्ह्यात आयटीआयची प्रवेश प्रक्रिया दहावीचा निकाल लागण्याच्या पूर्वीच सुरू झाली आहे. मात्र अद्याप या प्रक्रियेला म्हणावी तेवढी गती आलेली नाही. जिल्ह्यात १६ शासकीय, दोन आश्रमशाळा आणि तीन खासगी अशा २१ औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत. त्यामध्ये एकूण चार हजार १०० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता आहे. दहावीच्या गुणपत्रिका अद्याप न मिळाल्याने आयटीआयला अर्ज करणाऱ्यांची संख्या कमी दिसत आहे. मात्र लवकरच अर्ज वाढण्याची शक्यता आहे.
दहावीच्या ‘भरघोस’ निकालाचा घोळ
- दरवर्षी दहावीत कमी गुण मिळाल्यास विद्यार्थी तातडीने रोजगार मिळविण्याच्या उद्देशाने आयटीआय अभ्यासक्रमाकडे धाव घेतात. मात्र यंदा कोरोनामुळे दहावीची परीक्षा रद्द करून दहावीचा निकाल भरघोस लावण्यात आला. जवळपास सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले. बहुतांश विद्यार्थ्यांना ९० पेक्षा अधिक टक्के मिळाले. त्यामुळे आयटीआय पेक्षा आता विज्ञान किंवा वाणिज्य या शाखांमधून अकरावी करण्याकडे कल वाढला आहे. मात्र विद्यार्थ्यांचा हा मानसिक घोळ अकरावी प्रवेशाच्या सीईटीनंतर मिटणार असून त्यानंतरच आयटीआय प्रवेशासाठी अर्ज वाढणार असल्याचे जाणकारांनी सांगितले.
सर्वांनाच हवा ‘वायरमन’
मागील वर्षीप्रमाणे यंदाही वायरमन व इलेक्ट्रीशियन या दोन ट्रेडसाठी अर्ज येत आहे. इतर ट्रेडसाठीही विद्यार्थ्यांचा प्रतिसाद असला तरी दोन ट्रेडवर अधिक भर आहे. राज्यात आयटीआयच्या १ लाख ३६ हजार जागांसाठी ४७ हजार ९४८ अर्ज आले. केंद्रीय पद्धतीची असल्याने जिल्ह्यातील अर्जांचा आकडा सध्या अस्पष्ट आहे.